

सातारा : सातार्यात मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद घालत 7 हॅन्डसेट लंपास केले. गर्दीचा गैरफायदा घेत अलगत मोबाईलची हातसफाई झाली. या सर्व घटना सातारा शहर परिसरात प्रामुख्याने भाजी मंडई येथे घडल्या आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, रविवारी मोबाईल चोरट्यांनी मंडई टार्गेट केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
रामचंद्र विठ्ठल अवकिरे (वय 58, रा. शाहूपुरी, सातारा), योगेश भगवान माने (वय 37, रा. शनिवार पेठ, सातारा) या दोघांचे जुना मोटर स्टॅन्ड येथील भाजी मंडईतून मोबाईल चोरी झाले आहेत. राजेंद्र रावबा शिंदे (वय 62, रा. जकातवाडी ता.सातारा) यांचा मोती चौक येथून मोबाईल चोरी झाला आहे. विवेक महेंद्र मोरे (वय 32, रा. मोळाचा ओढा, सातारा), अंकुश रामचंद्र लोखंडे (रा. कृष्णानगर, सातारा) यांचा एसटी स्टॅन्ड समोरील भाजी मंडई येथून मोबाईल चोरी झाला आहे. दीपक शंकर निकम (वय 43, रा. सदरबझार, सातारा), संतोष चंद्रकांत बागल (वय 44, रा. शाहूनगर) यांचा पोवई नाका ते एसटी स्टॅन्ड रस्त्यावर मोबाईल चोरी झाला आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. रविवार असल्याने भाजी खरेदीसाठी नागरिक सकाळी मंडईसह मोती चौक, पोवई नाका, एसटी स्टॅन्ड परिसरात गेले होते. सर्वत्र गर्दीचा माहोल असल्याने याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी मोबाईल चोरीचा धमाका केला. मोबाईल नसल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दिवसभरात सात जणांसह इतर अनेकांचेही मोबाईल गेल्याची शक्यता आहे.
तक्रारदारांची मोठी रांग
तक्रारदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी धाव घेतल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. तक्रारदारांच्या तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर तक्रारदारांची मोठी रांग असल्याचे समोर आले. आणखी मोबाईल चोरी झाले असून गहाळ नोंदीदेखील पोलिसांनी घेतल्या आहेत. काही तक्रारदार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांना कळवले आहे. यामुळे शाहूपुरी पोलिस मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळणार? याकडे लक्ष लागले आहे.
दीड लाखाचे मोबाईल चोरीस
रविवारी मोबाईल चोरट्यांनी चोरी केलेले सर्व मोबाईल महागडे असल्याचे समोर आले आहे. चोरी झालेल्या प्रत्येक मोबाईलची किंमत कमीतकमी 11 हजार, तर जास्तीत 25 हजार रुपयांपर्यंत आहे. पोलिस ठाण्यात चोरी झालेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे दीड लाख रुपये इतकी आहे.