

वडूज : किरकोळ अपघातानंतर नुकसानभरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चारचाकी वाहन चालकास अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील बनपुरी येथे घडली आहे. या निर्घृण मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातील पिंपरी (ता. माळशिरस) येथील रहिवासी संजय पांडुरंग कर्चे (वय 55) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मयत संजय कर्चे यांची कन्या सोनाली संजय कर्चे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्या माहितीनुसार, त्यांचे वडील संजय कर्चे हे चारचाकी वाहनातून (एमएच 45, एएफ 3571) कांदे भरून नातेपुते येथून सांगलीकडे जात होते. रविवारी (दि. 15) रोजी सोनाली यांनी वडिलांना फोन केला असता, एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला. त्या व्यक्तीने सांगितले की, तुमच्या वडिलांनी बनपुरी येथे दोन दुचाकीस्वारांना धडक दिली असून, त्यात एकाचा पाय मोडला आहे. जखमीला उपचारासाठी सातारा येथे दाखल केले आहे. तुम्ही अपघातग्रस्त वाहनांचे आणि जखमींच्या औषधोपचाराचे पैसे दिल्यास आम्ही पोलिसांत तक्रार करणार नाही.
ही माहिती मिळताच सोनाली यांनी आपली बहीण वर्षा दत्तात्रय सोडमिसे हिला घटनेची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी आपले मामा रावसाहेब रामचंद्र खांडेकर (रा. लोणार खडकी, ता. माण) यांना तातडीने कातरखटाव येथे जाण्यास सांगितले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खांडेकर, बजरंग काळेल आणि शिवाजी क्षीरसागर हे कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे संजय कर्चे यांच्यावर उपचार सुरू होते.
यावेळी संजय कर्चे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले की, त्यांच्या चारचाकी वाहनाचा एका दुचाकीला घासून किरकोळ अपघात झाला होता. त्यानंतर दुचाकीवरील अज्ञात इसमांनी पाठलाग करून त्यांना थांबवले. हल्लेखोरांनी आणखी काही लोकांना बोलावून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. या बेदम मारहाणीत त्यांचा पाय आणि बरगडी मोडली, तसेच तोंडातून रक्तस्त्राव झाला. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रुपयेही काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
संजय यांच्या अंगावर, पाठीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते. त्यामुळे मामा रावसाहेब खांडेकर यांनी संजय कर्चे यांना उपचारासाठी खडकी येथे नेले. मात्र, सोमवारी सकाळी त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने म्हसवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी म्हसवड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अमानुष घटनेप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. श्रहल्लेखोरांच्या मारहाणीत संजय कर्चे यांचा पाय आणि बरगडी मोडली. तसेच तोंडातून रक्तस्राव झाला आहे. त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रुपयेही काढून घेतले. संजय यांच्या अंगावर, पाठीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.