Shivendraraje Bhosale| जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतोच : ना. शिवेंद्रराजे

कण्हेर येथील भाषणात कुस्तीच्या डावाचा दाखला
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale
Published on: 
Updated on: 

कण्हेर : एकनिष्ठ राहून विश्वासू असलेल्या व्यक्तीलाच पदाची लॉटरी लागते. परंतु बऱ्याच जणांना वाटतंय की बाबांना काय कळतंय? पण मला एक कळतंय की कोणाला कधी डोक्यावर टाकायचं. जो आपल्याला नडतो, त्याला आज ना उद्या टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकायचं आणि आपण बाहेर पडायचं. हाच कुस्तीतला डाव मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे, असा सूचक इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

नेले (ता. सातारा) येथील पै. नीलेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्‍या कार्यक्रमात ना. शिवेंद्रराजे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांच्या वक्तव्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ना. शिवेंद्रराजे यांनी राजकीय आखाड्यात अनेकांना इशारे दिले. ते म्हणाले, जिथून निघताय तिथून थेट बंगल्यात या, अधी-मधी, इकडे-तिकडे वळण घेऊ नका. निष्ठा असेल तर त्याचं चिज होईल; पण अनेकांना वाटतं बाबांना कुठं काय कळतंय? पण एक आहे, मला चांगलं कळतं, कुठे कुणाला डोक्यावर टाकायचं, एवढं मला नक्की कळतं. कुस्तीतला काय डाव आहे, पैलवान, मला काय माहीत नाही; पण डोक्यावर टाकल्यानंतरच त्याला कळतं की आपल्याला डोक्यावर टाकलं आहे, तोपर्यंत नाही कळत. तेवढाच डाव मी माझ्या वडिलांकडून शिकलोय. थांबायचं, आज नाय, उद्या नाय, परवा नाय, महिना, सहा महिने, वर्ष गेले पण कधी ना कधी जो आपल्याला नडतो तो टप्प्यात येतो, त्यावेळी त्याला बरोबर डोक्यावर टाकायचं आणि आपण बाहेर पडायचं.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सतीश अण्णांनी सांगितलं की बाबांनी सर्जेराव नानाचं सोनं केलं. परंतु नानांचं सोनं एकाच कारणामुळे झालं ते म्हणजे निष्ठा. ते थेट लिंबातून निघतात अन्‌ बंगल्यात येतात. अधी-मधी कधी शॉर्टकट मारत नाहीत. नानांचे वडील कॅप्टन अण्णा हे कायम भाऊसाहेब महाराजांबरोबर राहून त्यांनी विश्वास संपादन केला. तसंच नाना विश्वासू व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांची लॉटरी लागली आहे. दुसऱ्याचीही लागेल.

तर मी जिल्ह्याचा मागेच मालक झालो असतो...

खोडसाळपणाने गैरसमज पसरवणाऱ्यांना ना. शिवेंद्रराजे यांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले, शिवेंद्रबाबा मुद्दामहून जिल्ह्यातील कारखानदारांना दर देऊ देत नाहीत आणि दर जाहीर करू नका, असा कारखानदारांवर दबाव आणतात, अशी काही लोक उलट चर्चा करत आहेत. या जिल्ह्यातील प्रत्येक कारखानदार आज स्वतः मालक असून ज्याचे त्याचे नेतृत्व वेगळे आहे. हे जर सगळे माझे ऐकणारे असते तर मी जिल्ह्याचा मागेच मालक झालो असतो. हे सगळं खोडसाळपणे माझ्या व अजिंक्यतारा कारखान्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम काही तालुक्यातील आपलेच न बघवणारे लोक करत आहेत, असे सांगत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.