Satara Accident: साताऱ्यात मध्‍यरात्री थरार; दोन कारची जोरदार धडक

दोघे जखमी : मद्यप्राशन केल्‍याचा चालकावर आरोप
Satara Accident: साताऱ्यात मध्‍यरात्री थरार; दोन कारची जोरदार धडक
Published on
Updated on

सातारा : येथील राधिका चौकात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघेजण जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी बलेनो कार चालक सागर शिवाजी माने (रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताने मद्यप्राशन केल्‍याचा आरोप दुसऱ्या कार चालकाने केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दिलीप शिंदे (वय ३२, रा. कीर्ती पार्क, करंजे पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम शिंदे हे मित्रांसह अक्षय मनोहर भोसले यांच्या मालकीच्या टाटा टिगोर (एमएच ११ डीएच १७७१) या कारमधून पुणे येथील भक्ती-शक्ती संगम सोहळा आटोपून साताऱ्याकडे परतत होते.

दरम्यान, १० जुलै रोजी रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास बुधवार नाका-मोती चौक मार्गावरील राधिका चौक येथे एसटी स्थानकाच्या दिशेने भरधाव आलेल्या मारुती सुझुकी बलेनो (एमएच ११ डीए ६२७६) या कारने टिगोर कारला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की टिगोर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबावर जाऊन आदळली, तर बलेनो कारही पुढे जाऊन दुसऱ्या खांबाला धडकली.

अपघातानंतर बलेनो चालक वाहनातून खाली उतरला असता त्याच्या तोंडातून मद्याचा वास येत असल्याचे निदर्शनास आले, असे फिर्यादीत म्‍हटले आहे. या अपघातात शुभम शिंदे यांच्या उजव्या गुडघ्याला, तर गणेश कैजळे यांच्या डाव्या हाताला व कानाला दुखापत झाली. टिगोर कारच्या इंजिन, बोनेट, चेसिस, रेडिएटर, स्टेअरिंग, चाके आणि एअरबॅगसह विविध भागांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news