

सातारा : सातार्यातील नवीन एमआयडीसी परिसरात रस्त्याकडेला टाकलेल्या कचर्याच्या ढिगांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. पावसामुळे हा कचरा कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, यामुळे कर्मचारी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दंडात्मक कारवाईचा इशारा देणारा फलक लावूनही नागरीक कचरा टाकत असल्याने औद्योगिक महामंडळाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या आपला कचरा रस्त्यावर तसेच उघड्यावर टाकत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचर्याचे ढीग साचले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कचरा टाकणार्यांचे चांगलेच फावले आहे.त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने हा कचरा कुजून असह्य दुर्गंधी पसरली असून डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे परिसरातील कंपन्यांतील कर्मचारी, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीने परिसरात ‘येथे कचरा टाकू नये, कचरा टाकताना आढळल्यास 2 हजार रुपये दंड व फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल,’ अशा आशयाचा फलक लावला आहे. मात्र, या इशार्याला केराची टोपली दाखवत कचरा टाकणे सुरूच आहे. त्यामुळे केवळ फलक न लावता कचरा टाकणार्यांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.