

खेड : साताऱ्याच्या एमआयडीसी परिसरातील सुटकेस चौकात मद्यपींचा वाढता उपद्रव आणि वाढत्या अवैध धंद्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मुली, महिला कामगार त्रस्त झाल्या आहेत. याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नवीन एमआयडीसीतील अरिस्ट्रोकेट या स्थलांतरित झालेल्या कंपनीच्या चौकाला सुटकेस चौक म्हणून ओळखले जाते. या परिसरातील हा मुख्य चौक असून गजबजलेल्या या चौकात मद्यपी तरुणांचे टोळके दिवसभर वावरताना दिसते. परिसरातील अवैध धंदे व मटका व्यवहारामुळे मद्यधुंद तरूणांची पान टपऱ्यांवर मोठी गर्दी असते. हे तरूण रस्त्यावर शिवीगाळ, भांडणे, मारामारी करत रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या चालवतात. काही प्रसंगी रस्त्यावर वाहनं आडवी लावून वाहतूक ठप्प करण्यात येथील मद्यपी तरूण युवक मागे पुढे पाहत नाहीत. या परिसरात गतिरोधक नसल्याने अनेक वेळा अपघातही घडले आहेत.
या चौकालगत अनेक कंपन्या असून या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचारी काम करत आहेत. सायंकाळी साडेपाच नंतर महिला व कामगार बाहेर पडताना या मद्यपी तरुणांच्या ओरडण्याचा, गोंधळाचा आणि अर्वाच्य भाषेचा सामना त्यांना करावा लागतो. विशेषतः येथील बसस्टॉपवर उभ्या असलेल्या महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध धंदे बंद करून मद्यपी टोळक्यांवर लगाम घालावा. पोलिसंनी तातडीने कारवाई करून परिसरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.