

सातारा : सातारा एमआयडीसीच्या सर्वांगीण विकासासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले आणि सातारा इंडस्ट्रियल असोसिएशनने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत एमआयडीसीसंदर्भातील अनेक प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. इंडस्ट्रीयल असोसिएशनने केलेल्या मागण्या मान्य झाल्याने एमआयडीसीत समाधान असल्याची माहिती इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खरात यांनी दिली.
मुंबईत उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खरात, मास अध्यक्ष धैर्यशील भोसले, माजी अध्यक्ष संजोग मोहिते आदी उपस्थित होते. इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खरात यांनी मांडलेल्या प्रमुख १० मागण्यांपैकी अनेकांना मंजुरी देण्यात आली. नवीन व जुन्या एमआयडीसीसाठी सुमारे १३ कोटी ६९ लाख ६६ हजार रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली असून नवीन जलवाहिनी उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
एमआयडीसी विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे तसेच दुहेरी ग्रामपंचायत कराच्या प्रश्नावर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या सौ. निता खरात यांनीही विविध मागण्यांसंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.
बैठकीत सातारा आयटी पार्क प्रकल्पाला गती देणे, जागेचा ताबा मिळताच विकासकामे सुरू करणे, पुण्यात विशेष आयटी परिषद आयोजित करणे आणि साताऱ्यात जागतिक दर्जाच्या कन्व्हेन्शन सेंटरला तत्त्वतः मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातील ओपन स्पेसमध्ये 'देवराई' संकल्पनेवर वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, जुन्या एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलचे काम पूर्ण करणे, औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव आणि ईएसआयसी रुग्णालय उभारणीबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. हे सगळे विषय इंडस्ट्रीयल असोसिएशनने मांडले असल्याचे खरात यांनी सांगितले.
कोडोली ग्रामपंचायत व धनगरवाडी, कोडोली या दोन ग्रामपंचायतींनी भुखंडांची पाहणी करून नियमाप्रमाणे वाटप करावे, एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, गटारे व स्ट्रीटलाईटची दुरुस्ती, देगाव फाटा ते भोर फाटा स्ट्रीटलाईट बसवणे, कूपर कॉलनीसह निवासी भागातील सुविधा, भाजी मंडईसाठी जागा, कोडोली परिसरातील रस्ते, स्ट्रीटलाईट, सुरक्षा रक्षक नेमणे, कृष्णा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई करण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, एमआयडीसीचे अधिकारी व इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी संतोष पाटील, एमआयडीसीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य सौ. नीता खरात, इंडस्ट्रिअल असोसिएशन अध्यक्ष बाळासाहेब खरात यांच्या प्रयत्नामुळे सर्व विषय मार्गी लागले. त्यामुळे त्यांचे उद्योजक व परिसरातील ग्रामपंचायतींच्यावतीने आभार मानले जात आहेत.