

म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवी यांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चारांत, मंगलाष्टकांच्या मधुर स्वरांत, सनई-चौघड्यांच्या मंगलमय निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या मंगल सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.
या पारंपरिक विवाह सोहळ्याचा प्रारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरातील श्री म्हातारदेवाच्या मूर्तीसमोर सालकरांच्या हस्ते घटस्थापना करुन झाला. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुख्य मंदिरासमोरील हत्ती मंडपात देवी जोगेश्वरी व श्री सिद्धनाथ यांच्या उत्सवमूर्तींना हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. विवाह सोहळ्यानिमित्त मंदिरासमोरील मंडपातील अखंड पाषाणाच्या हत्तीवर सजवलेल्या अंबारीत सायंकाळी श्री सिद्धनाथांची उत्सवमूर्ती विराजमान करण्यात आली. मंदिरातील मुख्य मूर्ती आणि अंबारीतील उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील शेतकऱ्यांनी या मंगल विवाहानिमित्त उसाच्या मोळ्या अर्पण केल्या होत्या.
सायंकाळी मंदिर आवारातील उंच दगडी दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. मंदिर परिसर आणि शिखर विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांच्या सजावटीने उजळून निघाले होते. मंदिर आवारात विविध गावांतील गजी मंडळांनी गजीनृत्याचा फेर धरला होता. विवाह सोहळ्यानिमित्त गावातील दिवटीधारक मानकऱ्यांनी हत्तीसमोर मशालींसह रांग धरली होती. रात्री साडेअकरा वाजता सालकरांनी अंबारीतील श्रींची उत्सवमूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विवाह सोहळ्यासाठी नेली.
मध्यरात्री बारा वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारांत आणि मंगलाष्टकांच्या सुरात श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह विधी पार पडला. या सोहळ्यासाठी मानाचा पोशाख घेऊन आलेले मानकरी ओंकार राजेंद्र माने, गणेश माने, सालकरी सोमनाथ गुरव व त्यांच्या पत्नी सुरेखा, कुरवली शालन सांगावे, मंदिराचे विश्वस्त, मानकरी, गुरव मंडळी, श्री सिद्धनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी सपोनि पोमन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.