सातार्‍यातील मेडिकल कॉलेजसाठी हवेत 283 कोटी

दुसर्‍या टप्प्याची सुरुवात : कामात प्रगती, निधी मिळण्यात अधोगती
Satara News
सातार्‍यातील मेडिकल कॉलेजसाठी हवेत 283 कोटी
Published on
Updated on

सातारा : देशातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय सातार्‍यात होत असून, जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ही ऐतिहासिक घटना आहे. या छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे मेडिकल कॉलेज भविष्यात सुपरस्पेशालिटी सेवा देणारे वैद्यकीय केंद्र ठरणार असून, जिल्ह्याच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या विकासात क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. या कॉलेजच्या इमारत बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसर्‍या टप्प्याचे काम गतीने सुरू आहे. वेळेपूर्वीच आठ महिन्यांत कॉलेज इमारत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी 283 कोटी निधीची गरज आहे. सध्या ‘बांधकामात प्रगती मात्र निधी मिळवण्यात अधोगती’ अशी परिस्थिती सातारच्या मेडिकल कॉलेजबाबत आहे.

सातार्‍याचे वैद्यकीय महाविद्यालय बारा वर्षांपूर्वी मंजूर झाले. मात्र, राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्ष बांधकामाचा मुहूर्त मागील दोन-तीन वर्षांपूर्वी लागला. सातार्‍यासोबत राज्यात मंजूर झालेली इतर मेडिकल कॉलेजेस बांधून त्यामध्ये मेडिकलचे विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले असताना सातार्‍यात मात्र सरकारी उदासीनता आणि राजकारण यामुळे या मेडिकल कॉलेजला सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यानंतर कॉलेजची जागा ताब्यात मिळून त्यावरची अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, त्यातही सरकारकडून मंजूर झालेला निधी वेळोवेळी उशिरा मिळत गेला. मात्र तरीही हे काम गतीने पूर्ण करण्यात येत आहे. मेडिकल कॉलेज बांधकामाचा पहिला टप्पा पूर्णपणे पार पडला आहे.

‘न्याती’सारखी नावाजलेली बांधकाम कंपनी या मेडिकल कॉलेजचे बांधकाम करत आहे. या टप्प्यात सिव्हिल बांधकामाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. या टप्प्यांतर्गत 370 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, 600 हून अधिक विद्यार्थी क्षमतेचे स्वयंपाकगृह व डायनिंग हॉल, स्टाफसाठी चार स्वतंत्र इमारती, कॉलेज अधिष्ठात्यांचे निवासस्थान तसेच शवागृह व ओटोपी इमारत यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्धारित वेळेत पहिला टप्पा पूर्ण केला आहे. जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. या टप्प्यासाठी 491 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. अडीच वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्यासाठी 291 कोटी निधीची आवश्यकता आहे. मार्च महिन्यात या टप्प्याचे काम सुरू झाले असून ते 30 टक्केहून अधिक पूर्ण करण्यात आले आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत असली तरी पुढील आठ महिन्यांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. तसे झाले तर 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील भावी डॉक्टरांची बॅच शिक्षण घेण्यासाठी ही इमारत सज्ज झाली आहे. मेडिकल कॉलेजचे काम वेगाने सुरू आहे, मात्र निधी उपलब्ध होण्यास अडचण येत आहे. राज्य शासनाकडून निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचा कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंडळ तसेच आरोग्य विभागाने समन्वय साधत मेडिकल कॉलेजचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. निधी वेळेवर मिळाल्यास निश्चितपणे हा प्रकल्प वेळेआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील हजारो विद्यार्थी, डॉक्टर्स यांना दिलासा मिळणार असून सामान्य रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ होणार आहे. सातारा जिल्हा हा वैद्यकीयदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असून जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद व आशादायक बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news