

कराड : सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला तरी कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील अनेक गावे दुष्काळसदृश परिस्थितीत होरपळत आहेत. खरीप पिके हातची गेली असून, शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.
मसूर परिसरातील रिसवड, अंतवडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, हनबरवाडी, निगडी, खोडजाईवाडी, चिखली, किवळ, बानुगडेवाडी, गोसावेवाडी तसेच हेळगावचा पूर्व भाग हा नेहमीच पाणीटंचाईला सामोरा जात असतो. पुणे-बंगळूर महामार्गालगत तसेच नदीकाठचा परिसर हिरवागार दिसत असल्याने संपूर्ण भागाची परिस्थिती एकसारखी असल्याचे गृहीत धरले जात असल्याने त्यामुळे डोंगराळ व कोरडवाहू गावांना दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
या विभागातील काही गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागते. यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्याने खरीप हंगामातील सोयाबीनसह मूग, घेवडा, तूर, भुईमूग आणि अन्य कडधान्य पिकांवर परिणाम झाला आहे. पिकांच्या उत्पादनातून पेरणीचा खर्चही भरून निघण्याची परिस्थिती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाण्याची टंचाई केवळ शेतीपुरती मर्यादित राहिली नसून जनावरे तसेच डोंगर भागातील वन्यप्राण्यांनाही त्याचा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गायी, म्हशी, मेंढ्या व शेळ्यांसाठी पाण्याची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरत आहे. खरीप हंगामात घातलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. उसाची वाढही खुंटली आहे. उसाचे उत्पादनही कमी होणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याच धर्तीवर कराड तालुक्यातील दुष्काळी भागांचाही स्वतंत्रपणे विचार करावा, अशी मागणी होत आहे.