

सातारा : सातार्यातील कोडोली येथे मित्राला पार्टीला बोलावून जुन्या वादातून जबर मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, गेम करणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अक्षय दिलीप माने (वय 24, रा.धनगरवाडी, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी धनंजय यादव, प्रथमेश ऊर्फ पत्या चव्हाण, योगेश खवळे, रोहन जाधव व त्यांचा आणखी एक मित्र (सर्व रा. कोडोली, सातारा) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय माने याची बहीण दीपाली जितेंद्र केंजळे (वय 27, सध्या रा. कवठे, ता. कराड) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अक्षय माने हा मजुरी करत होता. गुरुवारी दुपारी अक्षयची बहीण तक्रारदार दीपाली केंजळे या सातार्यातील धनगरवाडीतील माहेरी आल्या होत्या. त्यावेळी अक्षय घरीच होता. यावेळी अक्षय याचा मित्र धनंजय यादव हा घरी आला. त्याने अक्षयला पार्टीला चल असे बोलू लागला. तेव्हा अक्षयने पार्टीला नकार देत ‘तुम्ही दारू पिल्यावर जुनी भांडणे काढून माझा सोबत भांडणे करता,’ असे म्हणाला. याउपरही धनंजय यादव अक्षय याला पार्टीला येण्यासाठी आग्रह करतच होता, असे तक्रारीत म्हटले आहे.
रात्री 11 वाजता अक्षय याच्या आईच्या मोबाईलवर फोन आला की अक्षय हा पाच एकराच्या प्लॉटमध्ये जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिव्हीलमध्ये नेले आहे. यानंतर तक्रारदार व त्यांची आई सिव्हीलमध्ये गेले. त्यावेळी डॉक्टरांनी अक्षयचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगितले. कुटुंबियांना अक्षयच्या डोक्याच्या मागील बाजुस दोन ठिकाणी मानेवर, कपाळावर, उजवे हाताच्या दंडावर व कोपरावर पाठीमागे, डाव्या पायाच्या मांडीवर, उजव्या पायाच्या मागील बाजूस मोठ्या जखमा दिसल्या. दरम्यानच्या काळात पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन संशयितांची माहिती घेवून त्यांना शोधण्याची मोहीम राबवली. अक्षयचा त्याच्या मित्रांनी पार्टीला बोलावून खून केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली. यानंतर दुपारपर्यंत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पार्टीला येण्यासाठी अक्षयला अधिक आग्रह झाल्याने तो हो म्हटला. पार्टीला कुठे जायचे आहे? कोण कोण आहे? असे विचारले असता धनंजय यादव याने पाच एकरच्या प्लॉटमध्ये पार्टी असून मी, प्रथमेश चव्हाण, रोहन जाधव, योगेश खवळे आणि एकजण मित्र असल्याचे सांगितले. धनंजय यादव जास्त आग्रह करत असल्याने अक्षय हा धनंजयसोबत पार्टीसाठी घरातून गेला. ही सर्व घटना अक्षय याच्या बहिणीसमोर घरातच घडल्याने खुनाची नेमकी माहिती समोर आली.