Man-Khatav water crisis: माण-खटावमध्ये पाण्यासाठी आक्रोश मोर्चा

तीव्र उष्णतेतही शेकडो शेतकरी व महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या
Man-Khatav water crisis: माण-खटावमध्ये पाण्यासाठी आक्रोश मोर्चा
Published on
Updated on

म्हसवड : माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे विभागाच्या कथित दुर्लक्षाविरोधात बुधवारी म्हसवड येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तीव्र उष्णतेतही शेकडो शेतकरी व महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मोर्चाची सुरुवात सिद्धनाथ रथगृह येथून झाली. सिद्धनाथ मंदिर, बाजारपेठ, सरकारी दवाखाना व एस.टी. स्टँड मार्गे मोर्चा अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी महिला शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदार सौ. मीना बाबर यांना निवेदन सादर केले.

या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनावर पाणी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला. काही भागांना दोन-दोन आवर्तने दिली जात असून माण तालुक्याच्या पूर्व भागाला एकही आवर्तन दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. करचे यांनी ‌‘जिहे-कटापूर‌’ योजनेचाही मुद्दा उपस्थित करत निवडणुकीनंतर त्या भागातील पाणीपुरवठा बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या आंदोलनामुळे माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news