

कराड : मलकापूर येथील चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे. आगाशिवनगरमधील चार कॉलन्यांमध्ये गत चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. देशभर चोवीस बाय सात पाणीपुरवठ्याचा नावलौकीक मिळविलेल्या व अनेक पुरस्कार मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेची बोंबाबोंब झाली असून, नागरिक विशेषत: महिला पाणी नसल्याने त्रस्त झाल्या आहेत.
गुरुवारी सकाळी 11 वाजता खंडित झालेला पाणीपुरवठा चार दिवसांपासून सुरू करण्यात पाणीपुरवठा विभाग अयशस्वी झालेला आहे. प्यायलासुद्धा पाणी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. देशभरात रोड मॉडेल ठरलेल्या मलकापूरच्या 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. गत चार दिवसांपासून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागा विरोधात संतप्त नागरिकांनी आक्रमक भुमिका घेत नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
मलकापूरमधील पाणी पुरवठा योजनेचे वर्षभरापासून संपुर्ण नियोजनच कोलमडले आहे. वीज नसल्याच्या नावाखाली अनेकवेळा दिवस-दिवसभर पाणीपुरवठा खंडित केला जातो. 2009 ला योजना सुरू झाल्यापासून 2023 पर्यंत पाणीपुरवठा काही अपवाद वगळता सुरळीत सुरु होता. गेल्या वर्षभरापासून विजेचा प्रॉब्लेम, पाण्याच्या चवीत बदल, गढूळ पाणी पुरवठा, भरमसाठ पाणी बिले अशा अनेक समस्या सुरू झाल्या आहेत. केवळ ढिसाळ व नियोजनशुन्य कारभारामुळे देशात नाव मिळविलेल्या पाणी पुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याबाबत कितीही तक्रारी झाल्या तरी पाणी पुरवठा योजनेवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे त्या तक्रारी कोणीही गांभीर्याने घेत नाही.
गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 11 वाजता आगाशिवनगरमधील वांग व्हॅली कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, अभिनव कॉलनी, शिवपर्वत कॉलनी व गणेश कॉलनी या चार कॉलन्यामध्ये चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. सलग चार दिवस पाणी बंद होण्याची वेळ यापुर्वी योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत कधीच आली नव्हती. मलकापूरातील चोवीस बाय सात नळ पाणीपुरवठा योजनेमुळे मलकापूरचे नाव जगाच्या नकाशावर गेले आहे. मात्र याच देशभर नावाजलेल्या योजनेमुळे शहरातील नागरिक वर्षापासून त्रस्त आहेत. वारंवार पाणीपुरवठा खंडीत होण्यामुळे नागरीकांचे पिण्याचे व खर्चाच्या पाण्याचे नियोजन ढासळले आहे.
पाणी पुरवठा 24 तास असल्यामुळे येथील नागरिक पाणी साठवून ठेवत नाहीत. पाणी पुरवठा खंडित होणार असल्याचे निवेदन नगरपालिकेकडून नागरिकांना सोशल मीडियाद्वारे मिळते. मात्र या चार कॉलन्यांमध्ये पाणी जाणार आहे. याबाबत कोणतेही निवेदन व माहिती नागरिकांना दिली गेली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवले नाही. पहिल्या दिवशी पाणी नसल्यामुळे प्रातःविधी, अंघोळ व स्वयंपाक, धुणे-भाडी सगळी कामे ठप्प झाली होती. पाणी नसल्यामुळे महिलांना अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकजण बिना आंघोळीचे कामावर निघून गेले. तर गत चार दिवसांपासून लहान मुलांना बिना आंघोळीचे हात पाय तोंड धुवून दिवसभर गप्प बसावे लागत आहे.
नागरिकांनी प्रात:विधीसाठी सुलभ शौचालयचा मार्ग धरला तर कोणी पाहुण्यांकडे जाऊन राहण्याचा मार्ग निवडला. आंघोळीसाठी चक्क नागरिकांनी कृष्णा नदी गाठली. 24 तास पाणी असणार्या व देशात नावाजलेल्या योजना जिथे आहे. तेथील म्हणजेच मलकापूर आगाशिवनगरमधील नागरिकांचे हाल आहेत. केवळ तांत्रिक अडचण आली म्हणून चार दिवसापासून येथील पाणीपुरवठा बंद आहे. चार दिवसात पाणी पुरवठा करण्यात काय अडचण आहे हेही कर्मचार्यांना समजले नाही. थोड्या वेळात पाणी येईल असे सांगून चार दिवस झाले वेळ मारून नेली आहे. कोणीही गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे चार दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
येथील जल अभियंत्याची बदली झाली आहे. त्यांच्या जागणी इतर कोणाचीच नियुक्त करण्यात आली नाही. कोणताही कर्मचारी व अधिकारी याची जबाबदारी घेत नाहीत. फोन केल्यानंतर थोड्या वेळात पाणी येईल, वीज असतानाही वीज गेली आहे, अशी खोटी उत्तरे देत आहेत. नंतर पुन्हा फोन केला तर ते उचलत नाहीत. पाणी कधी येणार, पाणी आम्हाला का नाही, याचा जाब विचारणार्या नागरिकांना आमच्याकडे तक्रार करायची नाही. नगरपालिकेत तक्रार करा अशी मुजोरीने उत्तर दिली जात आहेत. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.