Satara News: माहुलीतील प्रार्थनास्थळ जमीनदोस्त

पोलिस बंदोबस्तात कारवाई : ग्रीन झोनमधील लढ्याला अखेर यश
Satara News
Satara News: माहुलीतील प्रार्थनास्थळ जमीनदोस्त
Published on
Updated on

खेड : सातारा-कोरेगाव मार्गावरील क्षेत्र माहुली येथील रस्त्यालगत असलेल्या वादग्रस्त प्रार्थनास्थळावर अखेर प्रशासनाचा हातोडा पडला. अनधिकृत बांधकाम असल्याचे पाहणीअंती स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोकलेनच्या मदतीने हे बांधकाम पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केले.

क्षेत्र माहुली येथील रस्त्यालगत ग्रीन झोनमधील जागेवर २०१६ मध्ये प्रार्थनास्थळाचे बांधकाम केले होते. याच्या वैधतेबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. संबंधित बांधकाम हटविण्याची मागणी करीत नागरिकांनी मोर्चा आणि आंदोलनही केले होते. त्यामुळे या प्रार्थनास्थळाचा विषय काही वर्षांपासून चर्चेत होता. तक्रारींची दखल घेत प्रशासनाने जागेची पाहणी तसेच कागदपत्रांची तपासणी केली. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी पाहणी करून बांधकामाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. यानंतर प्रार्थनास्थळाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी कारवाईला सुरुवात केली.

प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव आणि सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या उपस्थितीत बांधकाम पाडले. कारवाईच्या वेळी तीन पोलिस अधिकारी आणि १५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.

अनेक वर्षांपासूनचा प्रश्न अखेर निकाली

प्रार्थनास्थळावर कारवाई होणार असल्याने प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली होती. पोलिस बंदोबस्तात कारवाई केल्याने वाद किंवा अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने नियोजित पद्धतीने कारवाई पूर्ण केली. बांधकामावर झालेल्या या कारवाईमुळे क्षेत्र माहुलीतील गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्रार्थनास्थळाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news