

खटाव : सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा पेच अद्याप पूर्णपणे सुटला नसला, तरी मुंबईत जोरदार हालचाली झाल्या आहेत. झेडपी निवडणुकांच्या निकालानंतरच्या कालावधीत जिल्ह्यात महायुतीच्या घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार तणातणी झाली असली, तरी भाजपच्या हायकमांडने फर्मान सोडल्याचे समजत आहे.
निवडणुकीपूर्वी किंवा निकालानंतर कुणी कुणाला कोणतीही जबान दिली असली, तरी विधानसभेत आहे तशी महायुतीचीच सत्ता सातारा झेडपीत स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातूनही काही अघटित घडून उलटफेर झालाच तर एकीकडे भाजपने स्वबळाची तयारी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही सुरुवातीपासूनचा एकत्र असण्याचा राग आणखी जोरात आळवण्याचा हच्चा राखून ठेवला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सातारा जिल्ह्यात जशी तणातणी आणि खडाखडी झाली तशीच वरिष्ठ स्तरावरही झाली असल्याने, तसेच एकमेकांची काही बोटे एकमेकांच्या खाली अडकली असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, आपली महायुतीच बरी’ या मतावर एकमत होण्याचे चित्र तयार झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने सर्वात अगोदर स्वबळाचा नारा दिला होता. पालिका, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरल्याने सातारा जिल्ह्यातही स्वतंत्र लढून कमळ फुलवण्याचा चंग भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बांधला होता. तसे पहायला गेले तर सातारा जिल्हा भाजपच्या स्वबळाच्या निर्णयाला हायकमांडचीही संमती होती हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. भाजपचा पालिका आणि झेडपी निवडणुकीपूर्वीचा पवित्रा पाहून जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षांनी सावध पावले उचलत एकमेकांना पूरक भूमिका घेतली. झेडपी निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पुन्हा कुणी काही टोकायला नको म्हणून महायुती म्हणून एकत्र लढण्याची साद घालून पाहिली होती. अपेक्षेप्रमाणे भाजपने त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतरच भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष जिल्ह्यात एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले.
निवडणूक निकालात भाजपचे स्वबळावर सातारा झेडपीत सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले. भाजपला बहुमतापेक्षा 6 जागा कमी म्हणजेच 27 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी लागणारे 33 सदस्यांचे संख्याबळ सेना आणि राष्ट्रवादीकडे आल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी आले. भाजपने झेडपीची निवडणूक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढली असली तरी सोलापूर झेडपीवर भाजपचा झेंडा फडकवणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी सातारा जिल्ह्यात स्वतःच्या माण- खटाव मतदारसंघासह इतर तालुक्यातही प्रचाराचे भिरकिट उडवले होते. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मंत्र्यांसह काँग्रेस आणि इतर अनेकांना अंगावर घेत त्यांनी भाजपचा आक्रमक इरादा स्पष्ट केला होता. पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांमधील कडाकडी संपूर्ण जिल्ह्याने पाहिली होती. मंत्री शिवेंद्रराजेंनीही निकालानंतर एक दोन वेळा गुगली टाकून भाजपचे इरादे स्पष्ट केले होते.
सातारा झेडपी निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यानंतर सेनेचे शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, नितीन पाटील एकत्र दिसू लागले. आम्ही अगोदर एकत्र होतो आणि आता निकालानंतरही एकत्र राहून झेडपीत सत्ता स्थापन करणार अशी त्यांची देहबोली होती. त्याच दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात विजयी सदस्यांचा सत्कार करताना काहीही झाले तरी सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा ठाम विश्वास व्यक्त करणारे वक्तव्य केले. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर अनेक वेगवान घडामोडी घडल्या. सेना, राष्ट्रवादी आणि भाजपने आपापली स्वतंत्र गट नोंदणी करुन घेतली. लागलीच राष्ट्रवादीने त्यांचे सदस्य गायब केले. सेनेनेही थोड्याफार प्रणात तोच कित्ता गिरवला. दरम्यानच्या काळात झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत जिल्ह्यात अनेक कांड्या पिकल्या.
एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार, भाजपला सत्तेबाहेर बसावे लागणार अशा वावड्या उठल्या तर दुसरीकडे भाजपने महायुतीसह सर्व पर्याय खुले ठेवत स्वबळावर सत्ता स्थापनेचे गणित सोडवत आणल्याचे चित्रही रंगवण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा कराडमध्ये जयकुमार गोरेंनी महायुती झाली तर ठिक अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, अध्यक्ष भाजपचाच होईल, आमचा तो हक्क आहे, असे वक्तव्य करुन भाजपने चालवलेल्या तयारीची झलक दाखवली. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी कोपरखळ्या मारत आम्ही छोटे पक्ष एकत्र होतो आणि आत्ताही आहोत, असे सांगून ससपेन्स चांगलाच वाढवला आहे.
सातारा झेडपीतील सत्तास्थापनेचा पेच इतर 11 जिल्हा परिषदांसाठी अवघड जागेचे दुखणे झाला आहे. इथला पेच सुटल्याशिवाय पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार नसल्याने अनेकांचा राजकीय राज्याभिषेक थांबला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा झेडपी सत्तास्थापना विषयात चांगलेच लक्ष घातल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडे मंत्री जयकुमार गोरेंनी इतर मतदारसंघात हस्तक्षेप वाढवल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यावर अगोदर कुणी, कुठे आणि कसा हस्तक्षेप केला, स्वबळावर निवडणुका लढल्यावर स्वतःच्या पक्षवाढीसाठी काय करणे गरजेचे आहे, अशी आणि इतरही काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अडचणीत असताना कुणाला कधी आणि कशी मदत करण्यात आली आहे, भविष्यातील राजकारणाचा विचार कुणी आणि कसा करावा याबाबतही मंथन झाले आहे. इतका सगळा काथ्याकूट सुरु असताना शनिवारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे हायकमांड एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात येवून संपूर्ण राज्याने महायुतीवर विश्वास दाखवला आहे, यापुढेही महायुती अभेद्य राहील आणि सातारा जिल्हा परिषदेत महायुतीच सत्ता स्थापन करेल, असे सांगून उलट सुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा निर्णायक प्रयत्न केला आहे.
सध्याचे चित्र पाहता सातारा झेडपीवर एकत्र असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होईल किंवा भाजप काही चमत्कार करुन स्वबळावर सत्ता स्थापन करेल, अशा शक्यता व्यक्त होत आहेत. राज्यात सध्या राजकारणाची पातळी कुठे गेली आहे हे पाहिले तर काहीही घडू शकते. अगदी भाजपबरोबर उरलेल्या दोनपैकी एक घटकपक्ष सत्तेत सामिल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातच राष्ट्रवादीच्या हायकमांड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे जाहीर वक्तव्य आले नसले तरी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा झेडपीत महायुतीची सत्ता असा संकेत दिल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी निवडले जाणार असल्याचे दिसत आहे.