Satara News| साताऱ्यात महावितरणचा खेळखंडोबा

नागरिक हैराण, व्‍यावसायिकांना फटका : कारभारावर प्रश्‍नचिन्‍ह
Electricity Supply
Electricity Supply
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा शहर व परिसरात महावितरणच्या कारभाराचा पुरता बोजवारा उडाला आहे. पावसाळ्‍यात सुरू असलेला बत्ती गुलचा खेळ पावसाळा संपत आला तरी सुरूच आहे. महावितरणकडून कोणत्‍याही पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडीत होत असल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार वीज पुरवठयाने चिमुरड्याचाही बळी घेतला. असा भोंगळ कारभार सुरू असताना अधिकारी नेमके करतात तरी काय? असा सवाल केला जात आहे.

पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाने ओढ दिल्याने सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यातच अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरांमध्ये उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्‍थितीतही शहराच्‍या काही भागात दिवसा वीज पुरवठा खंडीत ठेवला जात आहे. याचा सर्वसामान्‍यांसह उद्योगांनाही फटका बसत आहे. काही दिवसात घटस्‍थापना होणार असून महिन्‍यावर दिवाळीचा सण येवून ठेपला आहे. त्‍यामुळे बाजारपेठेत उत्‍सवाचा माहोल असताना महावितरणकडून मात्र वीजेचा खेळखंडोबा केला जात आहे. कोणत्‍याही कारणाशिवाय आणि पूर्वसूचनेशिवाय वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. इतरवेळी काही कामे असल्‍याने काही भागातील लाईट बंद केली जाते. मात्र, कोणतीही कामे नसताना का वीज जाते? असा सवाल केला जात आहे.

दुकाने, कार्यालये, वर्कशॉप, झेरॉक्स सेंटर, संगणक केंद्रांसह विविध व्यवसायांना वारंवार वीज खंडित होण्याचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्याने कामे रखडत असून, ग्राहकांना परत पाठवावे लागत असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांकडून महावितरणच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अनेकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी लागत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. संपर्क झालाच तर कर्मचार्‍यांच्‍या उध्‍दट वर्तनाला ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे.

तक्रार घेऊन आलेल्या ग्राहकांशी संयमाने संवाद साधण्याऐवजी आरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये अधिकच नाराजी निर्माण झाली आहे. 'वीज बिल वेळेवर भरायचे, मग वीजपुरवठाही सुरळीत मिळायला नको का?' असा सवाल गरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील विविध भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण काय, याबाबत महावितरणकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यासाठी वीज पुरवठा खंडीत करण्‍यापूर्वी अधिकार्‍यांनी माहिती द्यावी. वीज पुरवठा सुरळीत करण्‍यासाठी उपाययोजना कराव्‍या अन्‍यथा आंदोलन केले जाईल.
राहुल पवार शहराध्‍यक्ष, मनसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news