

महाबळेश्वर : राज्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ ते प्रसिद्ध वेण्णा तलाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबर उखडल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, धुळीमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्गही गायब झाल्याने पायी फिरणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे फुटपाथ कुठे गायब झाला? असा सवाल केला जात आहे. दिवाळी पर्यटन हंगामापूर्वी रस्ता आणि फुटपाथची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
महाबळेश्वर ते वेण्णा तलाव हा तीन किलोमीटरचा रस्ता शिरूर-पोलादपूर राज्य महामार्गाचा भाग आहे. पूर्वी या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. मात्र, २०२४ पासून हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) वर्ग करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने बिकट अवस्था झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा आणि अपूर्ण कामांमुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. खडी, वाळू आणि कच सर्वत्र विखुरला असून ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वाहनांचे नुकसान होत असून रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीचा फटका परिसरातील मळेधारकांच्या पिकांनाही बसत आहे. धुळीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
गतवर्षी एमएसआरडीसीकडून रस्त्यालगतच्या नाल्यांची कामे करण्यात आली; मात्र ती अपूर्ण राहिल्याने पादचारी मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी फुटपाथ मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांचे अस्तित्वच दिसत नाही. त्यावर रानटी वनस्पती वाढल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, बाजारपेठेतून वेण्णा तलावाकडे कुटुंबासह पायी जाणाऱ्या पर्यटकांना मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे.
दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. अशा वेळी रस्त्यावरील खड्डे, धूळ आणि पादचारी मार्गांचा अभाव यामुळे वाहतूक आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. संबंधित महामंडळाचे स्थानिक कार्यालय नसल्याने तक्रारी कोणाकडे करायच्या? असा सवाल नागरिक करत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून वेण्णा लेक रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करावे आणि रस्त्यालगतचे पादचारी मार्ग पूर्ववत करावेत. दिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाबळेश्वरप्रेमी नागरिकांकडून दिला जात आहे.