

महाबळेश्वर : महाबळेश्वर-तापोळा प्रमुख रस्त्यावरील बुरढाणी परिसरात गुरुवारी दुपारी दोन डंपरच्या हालचालीदरम्यान दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात सखुबाई कोंडीबा हिरवे (वय ६५, रा. कळमगाव मुरा, ता. महाबळेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक त्यांचे जावई विलास बाबुराव आखाडे (वय २५, रा. खिलार मुरा, ता. जावळी) गंभीर जखमी झाले. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी दोन डंपरच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सखुबाई हिरवे आजारी असल्याने विलास आखाडे त्यांना उपचारासाठी तळदेव येथील दवाखान्यात घेऊन जात होते. बुरढाणी हद्दीतील एका हॉटेलसमोर महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणारा डंपर (क्र. एमएच ११ डीडी ७६७१) ओव्हरटेक करत असताना, तापोळ्याकडून महाबळेश्वरकडे येणाऱ्या दुसऱ्या डंपरची (क्र. एमएच ११ डीडी ४६०७) हालचाल झाली. यावेळी दुचाकीला धडक बसली.
अपघातात सखुबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. विलास आखाडे यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सातारा येथे हलविण्यात आले. याप्रकरणी प्रशांत रामचंद्र ढेबे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.