Satara News| महाबळेश्वरमध्ये अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचा धोका

ऐन हंगामामध्ये रस्ते खुदाई : प्रचंड गैरसोयीमुळे पर्यटक त्रस्त
Mahabaleshwar News
महाबळेश्वरमध्ये अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचा धोका
Published on: 
Updated on: 

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाजवळील होली क्रॉस चर्चकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, काम अर्धवट अवस्थेत राहिल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला असून ऐन दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

शहरातील प्रमुख चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण काही वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या बाजूचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत होते, तर उन्हाळ्यात धुळीचा सामना करावा लागत होता. दिवाळी पर्यटन हंगामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने या रस्त्याची खुदाई केली. यावेळी पालिकेची पाण्याची पाइपलाइन तुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. त्यानंतर पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित असतानाही ते अर्धवटच राहिले आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पर्यटक आणि स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी एका पर्यटकाचे वाहन खोदलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात अडकल्याने नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे वाहन बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.