Satara News : महाबळेश्वरमध्‍ये १८३४ रेशन लाभार्थ्यांचे धान्य बंद

अटींच्या निकषावर छाननी; गरजूंच्या रेशनवर गंडांतर
Ration
Rationpudhari photo
Published on: 
Updated on: 

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या १८३४ लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थ्यांची पात्रता तपासणी आणि विविध निकषांच्या आधारे सुरू असलेल्या छानणीमुळे संबंधित कुटुंबांना रेशनवरील धान्य मिळणे थांबले आहे. तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे ५४४, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे ८ हजार ९९१ लाभार्थी आहेत. यापैकी उत्पन्नाच्या निकषांमधून १८३४ लाभार्थी कमी झाले आहेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून नियमानुसार धान्य उपलब्ध करून दिले जाते. लाभार्थ्यांची पात्रता निश्‍चित करताना शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद करण्याची कार्यवाही केली जात आहे. या निर्णयामुळे खरोखर गरजू असलेल्या कुटुंबांच्या धान्यपुरवठ्यावर परिणाम होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

लाभार्थ्यांच्या छानणीमध्ये चारचाकी वाहनांची मालकी हा चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. यावरून उलटसुलट चर्चा होत आहे. काही वाहनांचा वापर वैयक्तिक गरजांसाठी, तर काहींचा रोजगार, शेती किंवा व्यवसायासाठी केला जात असू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाबळेश्वर तालुका हा पर्यटनाबरोबरच ग्रामीण आणि डोंगराळ भागासाठीही ओळखला जातो. तालुक्यातील अनेक कुटुंबे शेती, शेतमजुरी, हंगामी रोजगार आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रेशनच्या धान्य पुरवठ्याचा लाभ बंद झाल्यास संबंधित कुटुंबांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यामुळे पात्रता तपासणी करताना केवळ उपलब्ध नोंदींवर अवलंबून न राहता संबंधित कुटुंबाची प्रत्यक्ष परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. चुकीच्या नोंदी किंवा माहितीतील तफावतीमुळे एखादा पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. धान्यपुरवठा बंद झालेल्या १८३४ लाभार्थ्यांपैकी किती जण अपात्र ठरले, किती प्रकरणांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आहे आणि किती लाभार्थ्यांना पुनर्पडताळणीनंतर पुन्हा लाभ मिळू शकतो, याबाबत माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. संबंधित लाभार्थ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी, आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा आणि निर्णयाविरोधात दाद मागण्याची संधी देणे गरजेचे आहे.

शेतीसाठी, घर बांधण्यासाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून अनेकांनी उत्पन्नाचे पुरावे दिले, कर भरले. मात्र, याचा अर्थ प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, असा होत नाही. केवळ उत्पन्नाच्या नोंदी किंवा वाहनाच्या मालकीवरून रेशनची पात्रता ठरवू नये.
महेश शेडगे, पाचगणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.