Satara News : गॅस वितरणावर ताण

अतिरिक्त मागणीचा परिणाम, ग्राहकांची तिसऱ्या दिवशीही झुंबड
Satara News
सातारा : तिसऱ्या दिवशीही गॅस एजन्सीबाहेर सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.
Published on
Updated on

सातारा : मध्य-पूर्व आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती परिस्थितीचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटू लागले आहेत. संभाव्य इंधन टंचाईची भीती आणि अफवांच्या वातावरणामुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. नेहमीच्या तुलनेत दररोज सुमारे 1200 सिलिंडरची अतिरिक्त मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सुमारे 22,195 गॅस सिलिंडरची गरज निर्माण झाली असून, दिवसाला 311 मेट्रिक टन म्हणजे महिन्याला 9 हजार 330 मेट्रिक टन इतका गॅस लागणार आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर झुंबड उडाली आहे. भविष्यात टंचाई निर्माण होईल, अशी भीती असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात बुकिंग करत असल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

सातारा जिल्ह्यात साधारणपणे दररोज सुमारे 20 हजार 800 घरगुती व 900 व्यावसायिक गॅस सिलिंडरची मागणी होती. यानुसार घरगुती गॅस सिलिंडरचा दररोजचा पूर्वीचा वापर 291 मेट्रिक टन इतका होता. महिन्याला हा वापर सुमारे 6 हजार मेट्रिक टन इतका होत असे. सध्याच्या परिस्थितीत सिलिंडरची मागणी वाढल्याने जिल्ह्यातील एकूण गॅस सिलिंडर वापरात मोठी वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात दररोज सुमारे 22 हजार 195 सिलिंडरचा वापर होत असून त्यासाठी 311 मेट्रिक टन गॅसची गरज भासत आहे. या वाढीचा विचार करता महिन्याला जवळपास सुमारे 9 हजार 335 मेट्रिक टन गॅसची आवश्यकता निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

या वाढलेल्या मागणीमुळे गॅस एजन्सींवर मोठा ताण आला आहे. अनेक ग्राहक प्रत्यक्ष एजन्सीकडे जाऊन सिलिंडर उपलब्धतेबाबत चौकशी करत असल्याने एजन्सीबाहेर गर्दी वाढली आहे. काही ठिकाणी ग्राहकांनी सकाळपासून रांगा लावल्याचे दिसून येत आहे. संभाव्य टंचाईची भीती मनात बाळगून अनेक ग्राहकांनी नेहमीपेक्षा आधीच सिलिंडर बुक करण्यास सुरूवात केल्याने मागणीचा आकडा झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गॅस सिलिंडरचा वापर सातारा शहर आणि त्यांच्या उपनगरांमध्ये होत असल्याचे दिसून येते. त्यानंतर फलटण, कराड आणि कोरेगाव या तालुक्यांमध्ये गॅसची मागणी असल्याने घरगुती गॅस सिलिंडरचा वापरही अधिक आहे. त्यामुळे अचानक वाढलेल्या मागणीचा सर्वाधिक ताण या भागातील गॅस एजन्सींवर जाणवत आहे. दरम्यान, सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे उत्पादन तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध गॅस साठ्याला प्राधान्य देताना घरगुती सिलिंडर वितरणाला महत्त्व दिले जात आहे. एक सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे.

सातारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा प्रामुख्याने वाई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे असलेल्या बॉटलिंग प्लांटमधून केला जातो. या प्लांटमध्ये हिंदुस्थान पेट्रालियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या प्रमुख तेल कंपन्यांच्या युनिटमधून सिलिंडर भरण्याचे काम केले जाते. अचानक वाढलेल्या मागणीमुळे गॅस कंपन्यांनी वितरण प्रणालीत व पद्धतीत बदल केले आहेत. पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागात ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर साधारणपणे 15 दिवसानंतर सिलिंडर उपलब्ध करुन दिला जात असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा कालावधी वाढवण्यात आला आहे. आता शहरी भागातील ग्राहकांना सिलिंडर मिळवण्यासाठी किमान 25 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, तर ग्रामीण भागासाठी हा कालावधी 45 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या बदलामुळे ग्राहकांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.

सध्या जिल्ह्यात दररोज सुमारे 1200 गॅस सिलिंडरची अतिरिक्त मागणी नोंदवली जात आहे. या वाढलेल्या मागणीमुळे दररोज 16 मेट्रिक टन अतिरिक्त गॅसची गरज भासणार आहे. या प्रमाणाचा विचार करता महिन्याला जवळपास 480 मेट्रिक टन अतिरिक्त गॅस उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. हा वाढलेल्या ताणाचे व्यवस्थापन करताना कंपन्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. तथापि सध्याची वाढलेली मागणी ही प्रत्यक्ष टंचाई नसून भीतीमुळे निर्माण झालेली असण्याची शक्यता अधिक आहे, अशा प्रतिक्रिया वितरकांकडून व्यक्त होत आहेत. भविष्यात गॅस मिळणार नाही, या भीतीने अनेक ग्राहकांनी अनावश्यकपणे बुकिंग सुरु केले असल्याने मागणीचा आकडा फुगलेला दिसत आहे. दरम्यान, ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यकपणे गॅस सिलिंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन गॅस वितरकांनी केले आहे.

गॅस एजन्सीजना पोलिस बंदोबस्ताची गरज

गॅस इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅसचा अवैध वापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वितरक कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढली आहे. गॅस वितरण करणाऱ्या व्यक्ती व ड्रायव्हर यांच्याशी अकारण वाद होत आहेत. त्यामुळे गॅस कंपनी, गॅस वितरक यांचे मागणीनुसार गॅस वाहतूक व वितरण करणाऱ्या वाहनांना व गॅस वितरक यांचे कार्यालयास आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरवण्याबाबत पोलिस अधीक्षकांना कळवावे, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी गृह शाखेकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news