

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद रस्त्यावर वाठार स्टेशन नजीक तळीये फाटा येथे शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास हायड्रा क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. किशोर विनायक भोसले (वय 53) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 21 रोजी चार वाजण्याच्या सुमारास किशोर भोसले हे दुचाकी (क्र.एम.एच 01 ए बी 2449) वरुन लोणंद-सातारा रोड वरून वाठार स्टेशनच्या दिशेने येत होते. तळीये फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या हायड्रा क्रेन (क्र. एम एच 09 एफ व्ही 1794) या वाहनाने जोराची धडक देऊन भोसले यांना दहा ते पंधरा फूट फरफटत नेले. या घटनेत किशोर भोसले हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. संबंधित क्रेन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.