

सातारा : सातार्याला 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा बहुमान मिळाला आहे. साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य आपण पेलू शकतो. जिल्ह्यात अनेकांना साहित्य संमेलनाची आवड आहे. आता कशाचीही वाट न बघता नियोजनाला सुरुवात करावी. परिषदेकडून याबाबत लवकरच तारीख जाहीर होईल. सातारकरांना साहित्य संमेलनाची नवी पर्वणी असणार, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्याला साहित्य संमेलन मिळाल्यानंतर आपल्या जल्लोषी भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फौंडेशनच्यावतीने सातार्याला 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान मिळाला. त्याबद्दल शिवतीर्थ पोवई नाका येथे जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे निवासी संपादक हरिष पाटणे, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, अविनाश कदम, शाहूपुरी शाखा अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष अॅड. चंद्रकांत बेबले उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्याला 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा बहुमान मिळाला आहे. साहित्य परिषदेने आपल्याला मान दिला असल्याने त्यांचे आभार मानतो. गेले 12 वर्षे साहित्य संमेलन सातार्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. दरवर्षी आपल्याला मान मिळेल असे वाटायचे. साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य आपण पेलू शकतो. दिल्ली, फॉरेन याठिकाणी साहित्य संमेलनही झालीत. स्व. भाऊसाहेब महाराजांनी 66 वे आणि 99 वे आपण घेतले. हा योगायोग जुळायची गरज होती. साहित्य संमेलनाची जबाबदारी एकटा पार पाडू शकणार नाही त्याला सर्वांची साथ हवी.
सातारा जिल्ह्याचा बहुमान असल्याने सर्वांनी या नियोजनात सहभाग घेतला पाहिजे. साहित्यप्रेमी सातारकरांच्या कायम लक्षात राहिले पाहिजे, असे नियोजन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेकांना या साहित्य संमेलनाची आवड आहे. आता कशाचीही वाट न बघता नियोजनाला सुरुवात करावी लागणार आहे. परिषदेकडून याबाबत लवकरच तारीख जाहीर होईल. त्यामुळे साहित्य संमेलन होणारे ठिकाण, परिसर यासह शहराचे सुशोभीकरण करावे लागणार आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यात व्हावे यासाठी ना. शिवेंद्रराजे यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले आहेत. सासवडच्या भाषणात शिवेंद्रराजेंनी साहित्य संमेलन सातार्यात व्हावे अशी मागणी केली. त्याचा बहुमान आता सातार्याला मिळाला आहे. 2014 ते 2024 पर्यंत आम्ही मागणी करत होतो अन् 2025 ला म्हणजे 12 वर्षांनी त्याला यश आले. सातार्यात होणारे संमेलन यशस्वी करून दाखवूच, मात्र यापुढे 100 व 101 वेही साहित्य संमेलनाची जबाबदारी दिल्यास पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ना. शिवेंद्रराजे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सचिन सावंत, आनंदराव कणसे, श्रीकांत कात्रे, शिरीष चिटणीस, संदीप श्रोत्री, राजेंद्र माने, राजकुमार निकम, प्रल्हाद पार्टे, धनंजय जांभळे, अमर बेंद्रे, रवींद्र माने उपस्थित होते. आभार नंदकुमार सावंत यांनी मानले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानतंर ना. शिवेंद्रराजे यांनी मत व्यक्त केले. त्यात त्यांनी माझा साहित्य संमेलनाशी तसा काही संबंध येत नाही. मी काय साहित्यात शिरलोय, कोणते पुस्तक लिहलंय असे काही नाही. मी असे म्हणू पण शकत नाही कि मी पुस्तक लिहायची तयारी करत आहे. पुस्तक लिहायचे कशावर हा प्रश्न आहे. माझ्याकडे अनेक विषय असून मला निर्णय करता येत नाही, असे म्हणताच हशा पिकला.