Satara Accident : आईला म्हणाला, ‘जेवण कर, मी येतो’; पण तो आलाच नाही!

लिंबखिंडीतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
Accident News
Accident News file photo
Published on: 
Updated on: 

लिंब : ‘आई, मी घरी जेवायला येतोय, माझ्यासाठी भाकरी कर,’ असा फोन करून आईला जेवणाची तयारी करण्यास सांगणाऱ्या सागर हेगडे याच्यावर काळाने घाला घातला. आईच्या हातचे जेवण खाण्यासाठी आतुर असलेला सागर घरी पोहोचलाच नाही. पुणे-बंगळूर महामार्गावरील लिंबखिंड येथे अज्ञात वाहनाला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या येण्याची वाट पाहणाऱ्या आईला मात्र त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी ऐकण्याची वेळ आली. या घटनेने परिसर हेलावला.

सागर गोपीनाथ हेगडे (सध्या रा. पाटखळमाथा, ता. सातारा, मूळ रा. आटके, ता. कराड) हा काही कामानिमित्त सातारा येथे आला होता. काम आटोपून तो दुचाकी (एमएच ५० एबी १६४१) वरून साताऱ्यातून गोव्याच्या दिशेने निघाला होता. पुणे-बंगळूर महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर लिंबखिंड परिसरात त्याच्या दुचाकीची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. या अपघातात सागरच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सागर हा पाटखळमाथा येथे एकटाच वास्तव्यास होता. गोवे येथे राहणाऱ्या आईला त्याने फोन करून घरी जेवायला येत असल्याचे सांगितले होते. आईनेही मुलासाठी भाकरी करण्याची तयारी केली. मात्र घरी येण्याचे वचन देणारा मुलगा नियतीच्या क्रूर घावाने कायमचाच हिरावला गेला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली.

‘आई, येतो’चा आवाज हरपला!

आईच्या हातच्या जेवणासाठी घरी येणाऱ्या सागरची वाट पाहणाऱ्या आईचे हृदय पिळवटून गेले आहे. काही क्षणांपूर्वी फोनवर ऐकलेला मुलाचा आवाजच तिच्या आठवणीत राहणार आहे. ‘भाकरी कर, मी येतो’ हे मुलाचे शेवटचे शब्द आईच्या काळजात कायमचे घर करून राहिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news