Satara Leopard Accident : रामकृष्णनगर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

पहाटे महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वाहनाची धडक
Leopard
LeopardPudhari
Published on: 
Updated on: 

वेणेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर रामकृष्णनगर (काशीळ), ता. सातारा गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वाहनाची धडक बसून ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काशीळ व परिसरातील शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. शेतकरी आणि ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः सायंकाळनंतर शेतात जाणे तसेच घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोकादायक बनले होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

मात्र, बिबट्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी पहाटे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृत बिबट्याचा देह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.