

सातारा/परळी : सातारा शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पावसाने उघडीप दिली असली, तरी अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. सातारा - ठोसेघर रस्त्यावर बोरणे घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती.
सातारा जिल्ह्यात गेले 8 ते 10 दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आले होते. पुरामुळे नदी व ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
सोमवारी रात्री सातारा - ठोसेघर मार्गावर बोरणे गावानजीक अतिवृष्टीने दरड कोसळली असून, या मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे रात्री मुक्कामी असलेल्या जांभे, चाळकेवाडी, राजापुरी या एसटी बसेस पलीकडेच अडकून पडल्या आहेत. दूध घेऊन जाणारी वाहनेही अडकून पडली. रस्ताच बंद झाल्याने प्रवासी, विद्यार्थी तसेच मुंबईला जाणारे लोक यांची गैरसोय झाली. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे.
मंगळवारी सातारा जिल्ह्यात सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात झालेला पाऊस असा, सातारा 34.9 मि.मी., जावली 4. 1 मि.मी., पाटण 30.8 मि.मी., कराड 33.8 मि.मी., कोरेगाव 34.7 मि.मी., खटाव 34.5 मि.मी., माण 34.3 मि.मी., फलटण 24.3 मि.मी., खंडाळा 25. 9 मि.मी., वाई 35. 1 मि.मी., महाबळेश्वर 55.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.