

Satara Kusumbi Nachni Farming
सातारा : जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कुसुंबी हे गाव 'नाचणीचे गाव' म्हणून राज्यासह देशभरात ओळखले जाऊ लागले. या गावच्या नाचणीचे खमंग पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. या गावात यंदा नाचणीची विक्रमी लागवड झाली असून ७०० हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे.
कुसुंबी गाव जावली तालुक्यात दक्षिणेस डोंगराच्या पायथ्याला असून 'कुसुंबीची काळेश्वरी देवी म्हणून या गावची ओळख महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व इतर राज्यात आहे. त्यात आता नाचणीच्या अति लागवडीमुळे कुसुंबीला नाचणीचे गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
14 ते 15 प्रकारचे विविध प्रॉडक्ट निर्मिती करून राज्यसह देशभरात विक्रीसाठी कुसुंबीकर पाठवतात. दरवर्षी दिवाळीला देखील दिवाळी फराळ अमेरिकेला पाठवला जातो. नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जात आहेत. नाचणीसारख्या पोषक अन्नधान्याची वाढती मागणी, कृषी विभागाची साथ व मार्गदर्शन तसेच ग्रोमिलेट्स महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शाश्वत बाजारपेठेचा उपलब्ध झालेला आधार या उपक्रमामुळे महिलांना उत्पनाचे सुरक्षित साधन उपलब्ध झाले आहे.