

सातारा : सातारा जिल्ह्यात साधारण 2.5 ते 3 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 15 हजार कुणबी जात प्रमाणपत्रे वाटण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची गुरुवारी अंतरवाली सराटी येथे सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत जिल्ह्यातील मराठा समाजाचे सामाजिक प्रश्न, कुणबी प्रमाणपत्रांमधील अडचणी आणि आगामी दि. 30 मे रोजी होणाऱ्या आंदोलनावर जवळपास एक तास सविस्तर चर्चा करण्यात आली.
सातारा गॅझेटिअर आणि कुणबी नोंदींचा मुद्दा ऐरणीवर आहे. बैठकीदरम्यान प्रतिनिधींनी सातारा गॅझेटिअरचा हवाला दिला. जिल्ह्यात साधारण 2.5 ते 3 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 15 हजार कुणबी जात प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत. राज्यात 57 लाख कुणबी नोंदी असलेल्या कुटुंबातील नागरिक गेली 59 वर्षे हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहिले आहेत, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. जातपडताळणी समिती मराठा समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शासनाने पुराव्यांच्या सत्यतेवर आधारित एकसमान कार्यपद्धत विहीत केल्यास नागरिकांना सुलभतेने कुणबी प्रमाणपत्रे मिळतील. तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयातील जे अधिकारी हेतुपुरस्सर कुणबी प्रमाणपत्र देण्यास विलंब करत आहेत अथवा टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर तातडीने बदलाची किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला राजेंद्र निकम, माऊली सावंत, विवेक कुराडे-पाटील, सोहम शिर्के, विक्रम शितोळे, किरण भोसले, डॉ. विकास देशमुख, अरुण काकडे, अमोल घाडगे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.