Satara Crime : कुडाळ परिसरात शेतीपंप, केबल चोरीने शेतकरी हैराण

हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याची भीती : चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
  Crime News
Crime News pudhari photo
Published on: 
Updated on: 

कुडाळ : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील इलेक्ट्रिक मोटर, शेतीपंप, पाण्याच्या मोटारींच्या केबल आणि शेतीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून सराईत गुन्हेगारांना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी कुडाळ विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर यंदा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नियोजन कोलमडले असून कॅनॉलमधून पंधरा दिवसांतून एकदाच पाणी सोडले जात असल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतातील मोटर आणि केबल चोरीला गेल्यानंतर पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मोटर चोरीला गेल्याने पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी, हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याची आणि संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

विशेष म्हणजे, या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य सुरक्षित राहील की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी गस्त घालावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि यापूर्वी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या सराईत चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

केवळ पंचनामा करून किंवा तक्रारी स्वीकारून प्रश्न सुटणार नाही; तर शेतकऱ्यांच्या चोरीला गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन चोरट्यांना जेरबंद करणे गरजेचे आहे. पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.