Krishna Factory Election : विश्वासाचा दिग्विजय, जबाबदारीची नवी सुरुवात

कृष्णा कारखान्यावर 'सहकार पॅनेल'चा ऐतिहासिक दिग्विजय!
Krishna Factory Election
विश्वासाचा दिग्विजय, जबाबदारीची नवी सुरुवात
Published on
Updated on

सतीश मोरे

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश जयवंतराव भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने मिळवलेला विजय हा केवळ निवडणुकीतील विजय नाही, तर तो सभासदांनी त्यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर आणि दूरदृष्टीवर व्यक्त केलेला ठाम विश्वास आहे. सुमारे ७० टक्के मतदान त्यांच्या पॅनेलच्या बाजूने पडणे, ही सहकार क्षेत्रातील अत्यंत दुर्मीळ घटना मानावी लागेल. त्यामुळे हा विजय राज्यातील सहकार चळवळीतील सर्वात मोठ्या दिग्विजयांपैकी एक ठरतो.

गेल्या ११ वर्षांपासून डॉ. भोसले यांनी कृष्णा कारखान्याचे नेतृत्व संयम, अभ्यासूवृत्ती आणि पारदर्शक कारभाराने केले. त्यापूर्वीही ६ वर्षे त्यांनी चेअरमन म्हणून काम पाहिले होते. अशा प्रकारे १७ वर्षांचा त्यांचा अनुभव सभासदांसाठी विश्वासाचा आधार ठरला. एक निष्णात शल्यविशारद ज्या पद्धतीने रुग्णाची काळजी घेतो, त्याच संवेदनशीलतेने त्यांनी कारखान्याची जबाबदारी सांभाळली. आर्थिक शिस्त, विकासाभिमुख निर्णय, सभासदहित आणि भविष्यातील स्पष्ट व्हिजन यामुळे कारखाना अधिक सक्षम झाला.

या निवडणुकीत विरोधी संस्थापक पॅनेललाही सुमारे ८ हजार मते मिळाली. त्यामुळे विरोधकांचे अस्तित्वही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये सक्षम विरोधक हे संस्थेच्या भविष्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे हा निकाल विजयाचा उत्सव असला, तरी विरोधी मतांचाही आदर राखणारा आहे. या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाला अनेक दिग्गजांचे समर्थन लाभले. माजी चेअरमन इंद्रजित मोहिते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, काँग्रेसचे कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम तसेच अनेक अनुभवी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार पॅनेलला साथ दिली.

कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या वाळवा तालुक्याचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी या निवडणुकीत कोणतीही उघड भूमिका घेतली नाही. मात्र, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यकर्त्यांचा कल डॉ. भोसले यांच्या सहकार पॅनेलकडे असल्याचे निकालातील मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येते. विशेषतः वाळवा तालुक्यात सहकार पॅनेलला मिळालेले मताधिक्य पाहता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष वाळवा विधानसभेचे आमदार जयंत पाटील यांनी सार्वजनिक भूमिका जाहीर केली नसली, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून अधोरेखित होते.

दुसरीकडे संस्थापक पॅनेलच्या नेतृत्वाची धुरा प्रथमच अर्चना मोहिते यांनी सांभाळत लढत दिली. त्यामुळे ही निवडणूक केवळ दोन पॅनेलमधील नव्हती, तर दोन कार्यपद्धती आणि दोन दृष्टिकोन यांच्यातील होती. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना प्रकृतीच्या काही मर्यादांमुळे या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सक्रिय राहता आले नाही. अशा स्थितीत त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांनी संस्थापक पॅनेलचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. गावोगावी जाऊन वैयक्तिक गाठीभेटी, सभासदांशी थेट संवाद आणि प्रचारावर त्यांनी विशेष भर दिला. पहिल्याच मोठ्या राजकीय-सहकारी परीक्षेत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. संस्थापक पॅनेलला त्यांच्या रूपाने एक नवीन आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले. पराभव झाला असला, तरी अर्चना मोहिते यांनी दाखवलेली जिद्द, संयम आणि संघटन कौशल्य भविष्यातील सहकार राजकारणात निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.

कृष्णा कारखान्याचा इतिहास संघर्षाचा, सहकाराचा आणि विकासाचा आहे. स्व. जयवंतराव भोसले आणि स्व. यशवंतराव मोहिते यांच्या काळातील संघर्ष, त्यानंतरचे ऐक्य आणि पुढील नेतृत्वाचा प्रवास या सर्व इतिहासाची पार्श्वभूमी या निवडणुकीला लाभली होती. त्यामुळे सभासदांनी मतदान करताना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील दिशा या तिन्ही बाबींचा विचार केला.

डॉ. भोसले यांनी संयमी, अभ्यासू आणि विश्वासार्ह नेतृत्वाच्या बळावर प्रचाराची सूत्रे हातात ठेवली; तर दुसरीकडे त्यांचे चिरंजीव तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आक्रमक, दमदार आणि प्रभावी प्रचाराची धुरा सांभाळली. सभासदांशी थेट संवाद साधत त्यांनी कारखान्याच्या भविष्यातील विकासाचा आराखडा मांडला. एकीकडे अनुभवी नेतृत्व म्हणून डॉ. सुरेश भोसले यांच्यावर असलेला विश्वास आणि दुसरीकडे युवा नेतृत्व म्हणून भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांची ऊर्जा व आक्रमक मांडणी, या दोन्हींचा सहकार पॅनेलला मोठा लाभ झाला. विशेषतः आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभांमधील प्रभावी भाषणांनी सभासदांवर सकारात्मक छाप पाडली. कारखान्याला अनुभवी नेतृत्वाबरोबरच सक्षम पुढील पिढीचे नेतृत्वही उपलब्ध आहे, हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला आणि त्याचाही या दणदणीत विजयात निश्चितच महत्त्वाचा वाटा राहिला.

आज या प्रचंड विजयामुळे डॉ. सुरेश भोसले यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा येणार आहे. हा विजय जितका मोठा, तितकी जबाबदारीही मोठी आहे. राज्यातील अग्रगण्य सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या कृष्णा कारखान्याला स्पर्धेच्या नव्या युगात अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सभासदकेंद्रित बनविण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल. सभासदांनी त्यांना पुन्हा एकदा डोक्यावर घेतले आहे. आता त्या विश्वासाचे सोनं करण्याची वेळ डॉ. भोसले यांच्यावर आहे. हा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नाही, तर विश्वास, विकास आणि सातत्यपूर्ण कामाचा विजय आहे. त्यामुळे या दिग्विजयाचे खरे मोल पुढील पाच वर्षांच्या कामगिरीतूनच सिद्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news