

पाटण : मानवी वस्तीच्या उंबरठ्यावर जखमी बिबट्या आणि मदतीसाठी तासभर प्रतीक्षा, अशा दुहेरी संकटाचा सामना कोयनानगरवासीयांना करावा लागला. नवीन मार्केट परिसरातील पोस्ट ऑफिसच्या मागे, घराशेजारील ओढ्याजवळ जखमी बिबट्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दुपारी १२.३० वाजता माहिती देऊनही वन्यजीव विभागाचे कर्मचारी तब्बल एक तासाने, म्हणजे १.३० वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वनविभागाच्या तत्परतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार, बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असून त्याच्या डोळ्याला इजा झाली होती. नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. कर्मचारी दाखल झाल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी बचावमोहीम सुरू करण्यात आली स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. अखेर दुपारी २.२० वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पुढील उपचारांसाठी त्याला कराड येथे दाखल करण्यात आले.
वन्यजीव विभागाने केवळ घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संवेदनशील भागांत नियमित गस्त, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर देखरेख, कॅमेरा ट्रॅप आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यावर भर देणे आवश्यक आहे. जुन्या वसाहती, पडक्या इमारती आणि झाडीझुडपांच्या परिसराचीही पाहणी झाली पाहिजे.
बिबट्याला पकडण्यात यश आले असले, तरी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यास एक तास का लागला, याचे उत्तर वनविभागाने द्यावे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? कोयनानगरमधील वाढत्या बिबट्या वावरावर नियंत्रणासाठी ठोस कृती आराखडा कधी राबवणार, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
कोयनानगर बिबट्यांचे केंद्र बनतेय?
कोयनानगर परिसरात बिबट्यांचा मानवी वस्तीजवळील वावर वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी निवासी परिसरात बिबट्याची तीन पिल्ले आढळली होती. आता नवीन मार्केटसारख्या वर्दळीच्या भागात जखमी बिबट्या सापडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार अशा घटना घडत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमक्या कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.