

पाटण : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांची वरदायीनी ठरलेल्या कोयना धरणातील पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती करून समुद्राला वाया जाणारे तब्बल ६७.५० टीएमसी पाणी हे मुंबईला पिण्यासाठी नेण्याचा घाट मागील अनेक वर्षांपासून घातला जात आहे. यावर्षी अल निनोचा धोका, राज्यभर दुष्काळाची परिस्थिती या निमित्ताने पुन्हा राज्य शासनाकडून याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असल्या तरी याबाबत न परवडणारा खर्च, कोयनेचे शासकीय बकालपण याच धरणाच्या माध्यमातून तब्बल ६५ वर्षांपासून प्रलंबित पुनर्वसनाचे प्रश्न, सिंचन व वीजनिर्मितीचा ताळमेळ या सर्व बाबींचा विचार करूनच मग हे धाडसी पाऊल उचलावं लागणार असल्याचे मत जलतज्ञांकडून व्यक्त होत आहे.
प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीसाठी कोयना धरणाची निर्मिती झाली असली तरी मागील काही वर्षात जलविद्युत निर्मितीपेक्षा सिंचनासाठी कोयनेच्या पाण्याला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रावर मोठं जलसंकट निर्माण झाल्यानं कोयना धरणातील पाण्याला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झाले आहे. कोयना धरण यावर्षीही पूर्ण क्षमतेने भरले होते व सुरूवातीला यापैकी काही टीएमसी पाणी हे विनावापर पूर्वेकडे सोडूनही देण्यात आले होते. मात्र यावर्षी राज्याची एकूणच दुष्काळाची परिस्थिती व तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता कोयनेच्या पाण्यावर स्वाभाविकच सर्वांचाच डोळा आहे. येणाऱ्या काळात प्रामुख्याने या धरणातील पाण्यावर आधारित जलविद्युत निर्मिती पेक्षाही सिंचनासाठी पाण्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल, त्यातूनही वेळप्रसंगी सिंचनासाठी उपसा बंदी लागण्याच्या शक्यताही आहेत.
कोयना पश्चिम जलविद्युत निर्मितीसाठी वर्षभराच्या एकूण पाण्यापैकी १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील एकूण पाण्यापैकी एक जून ते ३१ मे या जलवर्षात यापैकी ६७.५० टीएमसी पाणी हे पश्चिमेकडे वळवून त्यातून पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यात सरासरी १९२० मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मिती करून झाल्यानंतर ते पाणी चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदीमार्गे समुद्राला वाया जाते.
हेच वाया जाणारे पाणी पहिल्यांदा स्थानिक कोकणात पुरवठा करण्यात यावा अशी अनेक वर्षांची मागणी आहे, त्याचवेळी मुंबईची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन हे पाणी मुंबईला नेण्यात यावे असाही वर्षानुवर्षांचा प्रस्ताव आहे. परंतु या प्रकल्पासाठी होणारा खर्च हा न परवडणारा असल्याने त्या त्या वेळी केवळ कागदी घोडे नाचवण्या पलीकडे याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. आता पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला असल्याने कोयनेचे हेच ६७.५० टीएमसी पाणी मुंबईला नेताना अफाट खर्चाची तरतूद करावी लागणार आहे.