

सातारा : पुण्यातील उद्योगपती गोयल कुटुंबीयांनी कांदाटी खोर्यातील खरोशी (ता. महाबळेश्वर) येथे सुमारे २०३ एकर जमीन खरेदी केली आहे. कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन झाल्याने या खरेदीत घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले, असा खळबळजनक आरोप पर्यावरण व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली.
खरोशी भूखंड चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये गोयल कुटुंबीयांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. ही जमीन पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात येते. या भागात जमीन वापर, जमीन धारणा, जमीन हस्तांतरण तसेच संभाव्य विकासकामांचा पर्यावरणावर परिणाम होणे शक्य आहे. त्यामुळे महसूल व पर्यावरणीयदृष्ट्या चौकशी होण्याची गरज आहे. नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली या परिसरात रिकाम्या जागा बळकावणारे ‘मुळशी पॅटर्न’ दिसत आहेत.
कांदाटी खोर्यातील काही गावांत पुण्या-मुंबईच्या राजकीय लोकांसह अधिकारी लॉबीकडून जमीन खरेदी सुरू आहे. त्यातच खरोशीत शेकडो एकर जमिनीची नियमबाह्य खरेदी-विक्री झाल्याचे उघडकीस आले. यात आशिष शिवकुमार गोयल यांनी २४, विनोद रघुवीरसिंह गोयल यांनी १३, शिवकुमार रघुवीरसिंह गोयल यांनी १७, अशोक रघुवीरसिंह गोयल यांनी २९ हेक्टर क्षेत्र खरेदी केले आहे. सर्व मिळून सुमारे २०३ एकरपेक्षा जास्त भूखंडाचा मामला असल्याचे स्पष्ट होतेये. ही जमीन कोरडवाहू व पडीक असल्याने या जमिनीची ५४ एकर एवढी कमाल जमीन धारणेची मर्यादा निश्चित असल्याचे दिसून येते. त्यामुळे गोयल कुटुंबीयांवर जमीन धारणेची कमाल मर्यादा उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
खरोशी शेजारील झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात ६४० एकर जमीन खरेदी करत गावच विकत घेण्याचा प्रकार घडला होता. अहमदाबाद येथील तत्कालीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व नातेवाईकांचे हे प्रकरण देशभर गाजले होते. संबंधितांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र, झाडाणी प्रकरण ताजे असतानाच खरोशी प्रकरण समोर आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
कायदा काय सांगतो?
जमिनीची प्रतवारीनुसार खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे. बागायत जमिनीसाठी १८ एकर, वर्षातून एका पिकासाठी खात्रीचा पाणीपुरवठा असलेल्या जमिनीसाठी २७ एकर, हंगामी बागायत किंवा भात शेतीसाठी ३६ एकर कमाल धारणा क्षेत्र निश्चित आहे. कोरडवाहू जमिनीसाठी कमाल जमीन धारणेची मर्यादा ५४ एकर एवढी निश्चित केली आहे.