Satara Crime| दारूला पैसे न दिल्याने खून

कोेरेगावमधील घटना; संशयिताला अटक
Satara Crime News
दारूला पैसे न दिल्याने खून
Published on: 
Updated on: 

कोरेगाव : दारू पिण्यासाठी पैशाची वारंवार मागणी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून धारदार लोखंडी शस्‍त्राने डोक्यावर वार करून एकाचा खून करण्‍यात आला आहे. शनिवार, दि. ७ रोजी रात्री ११.३० च्‍या सुमारास कोरेगाव नगरपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे घडली. सुधीर यादव (वय ५६) असे खून झालेल्‍या व्‍यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित आरोपी अभिषेक चंद्रकांत धनगर (वय २२, रा. कोरेगाव) याला अटक केली. याबाबत मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री संशयित अभिषेक हा बाजारपेठ परिसरात गेला होता. यावेळी त्‍याने सुधीर यादव यांच्‍याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. यादव यांनी पैसे दिल्‍यानंतर तो स्‍वत:ला दारू व यादव यांना सिगारेट घेऊन आला. यानंतर पुन्‍हा अभिषेक याने यादव यांच्‍याकडे पैशाची मागणी केली. त्‍यावर यादव यांनी पैसे देण्‍यास नकार दिला.

यावरून दोघांमध्‍ये टोकाचा वाद झाला. याचदरम्यान यादव यांना त्यांच्या दुचाकीची चावी सापडत नव्हती. धनगर याने पैशासाठी चावी काढून घेतल्याचा त्यांना संशय आला. यावरून वाद अधिकच चिघळला. संतप्त झालेल्या धनगर याने धारदार लोखंडी शस्‍त्राने यादव यांच्या डोक्यावर वार केले. यामुळे यादव हे रक्‍तबंबाळ झाले. त्‍यांना रुग्‍णालयात दाखल केले होते. मात्र, त्‍यांचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाला. याप्रकरणी सुनीता यादव यांनी कोरेगाव पोलिस ठाण्‍यात फिर्याद दाखल केली.

घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर अवघ्‍या काही तासांतच पोलिसांनी शोधमोहीम राबवली. यानंतर अभिषेक धनगर याला अटक केली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक ओंकार भेगडे, अतुल जगदाळे, हवालदार राहुल कुंभार, नागराज कदम, गणेश शेळके, तसेच एलसीबीचे स.पो.नि. रोहित फार्णे, हवालदार सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, राजू कांबळे व शिवाजी भिसे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.