

कोरेगाव : दारूची बाटली देण्यावरून झालेल्या वादात लोखंडी पाईपने केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून संशयिताला अटक केली. सुभाष परशुराम बर्गे (58) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र यल्लप्पा शिवनगी ऊर्फ राठोड या संशयिताला अटक करण्यात आली आहे.
9 मे रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास कोरेगाव येथील आझाद चौक ते बाजारपेठ रस्त्यावरील एका देशी दारू दुकानासमोर दारूची बाटली देण्यावरून सुभाष व रवींद्र यांच्यात वाद झाला होता. यातून सुभाष परशुराम बर्गे याच्या डोक्यात, छातीवर व पायावर मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बर्गे यांच्यावर प्रारंभी कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात हलवले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
संशयित रवींद्र यल्लप्पा शिवनगी ऊर्फ राठोड याला या गुन्ह्यात अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी व पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन केनेकर करत आहेत.