Satara News : खटावमध्ये स्वाभिमानीने रोखली ऊस वाहतूक

नऊ गावांत पदाधिकाऱ्यांची धडक मोहीम : ऊसदर मिळेपर्यंत तालुक्यात तोडी बंद
Satara News
खटावमध्ये स्वाभिमानीने रोखली ऊस वाहतूक
Published on: 
Updated on: 

वडूज : ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळाल्याशिवाय खटाव तालुक्यातील कोणत्याही साखर कारखान्याची ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार आणि तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी थेट ऊसाच्या फडात उतरून वाहतूक रोखण्याची मोहीम सुरू केली आहे. यामुळे काही ठिकाणी ऊसतोड आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

गोपूज, वाकळवाडी, नायकाचीवाडी, निमसोड, अंबवडे, हिंगणे, डाळमोडी, चितळी आणि मायणी या गावांमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसदराच्या प्रश्नावर भूमिका मांडली. ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असून, दराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ऊस कारखान्याला पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले.

ऊस वाहतूकदारांना समज देऊन वाहतूक थांबविण्याची विनंती करण्यात आली. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरू ठेवल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दत्तूकाका घार्गे यांनी दिला. ऊसदराचा प्रश्न सुटेपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास कारखान्यांच्या गव्हाणी बंद पाडण्यापर्यंत आंदोलन नेले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनहिरा, अजिंक्यतारा, शिवनेरी, वर्धन (पडळ), खटाव आणि जरंडेश्वर यांसह संबंधित साखर कारखान्यांच्या प्रशासनाने ऊस परिषदेत जाहीर झालेल्या दराबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दराच्या मागणीसाठी संघटना आंदोलन करत असताना शेतकऱ्यांनीही त्याला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले. आपल्या हक्काच्या दरासाठी काही दिवस ऊसतोड थांबली, तरी तात्पुरत्या अडचणींपेक्षा योग्य दर मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवावी, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news