

खटाव : पावसाळा सुरू असतानाही अवर्षणप्रवण पट्ट्यातील खटाव तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही पाऊस गायब झाला आहे. ऐन पावसाळ्यात पावसाऐवजी उन्हाचे चटके बसत असल्याने खरिपाची पिके होरपळून निघत आहेत. दिवसभर उन्हाची तीव्रता वाढून अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार आहेत.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच खटाव तालुक्यात पावसाने ओढ दिली होती. किरकोळ पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर रिमझिम पावसाच्या जोरावर पिकांनी उगवण धरल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. आता तर खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज असताना आभाळ निरभ्र आणि उन्हाचा तडाखा वाढला आहे.
खटाव तालुक्यात वाटाणा, सोयाबीन, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल तसेच विविध कडधान्ये आणि तेलबियांची खरीप हंगामात लागवड करण्यात आली आहे. यातील अनेक पिके सध्या महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यावर आहेत. विशेषतः वाटाणा पिकाला शेंगा भरण्याच्या काळात पुरेशा पाण्याची आवश्यकता आहे, मात्र याच कालावधीत पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत.
जमिनीतील ओल झपाट्याने कमी झाल्याने पिकांची पाने कोमेजत आहेत. सर्वच मंडलात पिकांची वाढ खुंटली असून, अगदी दोन चार दिवस पावसाने अशीच पाठ फिरवली तर हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम डोळ्यादेखत उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पेरणीच्या वेळी पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च करून खरीप हंगाम उभा केला होता. आता पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने केलेला खर्च, घेतलेली मेहनत आणि उराशी बाळगलेली नगदी उत्पादनाची आशा धुसर झाली आहे. अवर्षणप्रवण पट्ट्यातील शेती आधीच निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे.