Satara Kharif Sowing: शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग

बैलजोडीसह ट्रॅक्टरच्या साथीने पेरणी करण्यात शेतकरी मग्न; सर्वत्र शेतात कामांची धावपळ सुरु
Satara Kharif Sowing: शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग
Published on
Updated on

उंब्रज : गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने जमिनीत चांगली ओल झाली आहे. सध्या गेले चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने लांबणीवर पडलेल्या खरीप पेरणीच्या कामांना वेग आला आहे. बळीराजा बैलजोडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीची कामे लगबगीने उरकून घेत असल्याचे चित्र शिवारात पहावयास मिळत आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेतीची लगबग वाढली असून सर्वत्र शेतात कामांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गत आठवड्यात उंब्रजसह परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेत जमिनींमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने लांबणीवर पडलेली खरीप हंगामातील पेरणीची कामे आता वेगाने सुरू झाली आहेत. हवामान खात्याने पुन्हा पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने लांबणीवर पडलेली पेरणीची कामे लगबगीने उरकून घेतली जात आहेत.

सध्या शिवारात भुईमूग, सोयाबीनची पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरचा वापर करताना दिसत आहे. यावर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. परिणामी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी रखडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला असून पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.

उंब्रजसह परिसरातील पाल, इंदोली, पेरले, चरेगाव, भोळेवाडी, शिवडे आदी भागांमध्ये शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात पेरणीची कामे करीत आहेत. काही ठिकाणी बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने पेरणी केली जात आहे.

तर बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या आधुनिक यंत्रणेद्वारे कमी वेळात अधिक क्षेत्राची पेरणी पूर्ण करण्यावर भर देत आहेत. सोयाबीन, भात, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद यासारख्या खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला असून, आगामी काही दिवसांत मान्सूनचा नियमित पाऊस सुरू झाल्यास पिकांच्या उगवणीस मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news