

मारूल हवेली : यंदा झालेल्या सततच्या पावसामुळे कडधान्य व इतर पिके उफाळून गेली आहेत. तसेच ढगाळ वातावरणामुळे किडीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या भात पीक जोमात, तर कडधान्य व अन्य पिके कोमात गेल्याने अगोदरच उशिरा पेरणी झालेला यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. पिकांची वाढ खुंटल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र पडून राहणार आहे.
यावर्षी पाटण तालुक्यात मे महिन्यातच पावसाने सुरूवात केली. मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला. मात्र वळीव व मान्सून सलग लागून राहिल्याने शेतकर्यांना वेळेत पेरण्या उरकता आल्या नाहीत. सतत पडणार्या पावसामुळे अडथळा आल्याने पेरणीची टक्केवारी चांगलीच घसरली. अनेक शेतकर्यांच्या शेतात नुसते तण येवून शेत पडून आहेत. यंदा जादा पावसाने अक्षरशः शेतकर्यांचे डोळे पांढरे केले. सतत पाऊस पडत असल्याने उभ्या पिकाला जोर नाही, तर पिकांपेक्षा शेतात तण जास्त वाढले आहे. पावसाची रिपरिप चालूच राहिल्याने शेतकर्यांना भांगलण व कोळपणीची कामे नीट करता आली नाहीत. सतत पडणार्या पावसामुळे चालू वर्षी शेतात विविध प्रकारच्या तणांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. गत महिन्यात पावसात सुद्धा अनेक शेतकर्यांनी घरगुती व मजूर लावून कोळपणी, भांगलण करून घेतली. मात्र जादा पावसाने त्याचा फारसा फायदा झालेला नाही.
सततच्या पावसाने कडधान्य, भाजीपाला व विविध पिके उफाळली आहेत. सोयाबीन पिवळे पडून त्याची वाढ खुटंली आहे. भुईमूगाचे डाहळे मोठे झाले आहेत. मात्र अति पावसाने अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याचे बोलले जाते. पावसाने सर्व पिके कुचंबली असून कडधान्य पिके कुजून गेली आहेत. त्यामुळे चालू वर्षी शेतात घातलेला खर्च तरी निघेल का अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यावेळी सर्वात जास्त फायदा कमी खर्चात पेरणी केलेल्या भात शेतीसह रोप भातांच्या पिकांना होणार आहे. जादा पावसामुळे भाताची वाढ चांगली झाली असून सर्वात जास्त उत्पन्न भात करणार्या शेतकर्यांना मिळेल . काही ठिकाणी हवामानातल्या बदलामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. धुळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कडधान्यातील मुग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके अति पावसाने कुजून वाया गेली आहेत. जादा पावसामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक शेतकर्यांनी केलेल्या आडसाली ऊस लागणीच्या उगवणीस मार बसला आहे. पाटण तालुक्यात नदी काठच्या भागात पाण्याची सोय असल्याने आडसाली लागणी होतात. परंतु यंदा केलेल्या आडसाली लागणी व रोप लागणी ऊस पिकाची वाढ न झाल्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. अति पावसामुळे ऊस पिकांची वाढ खुंटली असून ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होईल अशी शक्यता देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.