Kelghar Ghat: केळघर घाट वाहतुकीसाठी डेंजरझोन

काळा कडा परिसर धोकादायक : संरक्षक कठड्यांचा अभाव
Kelghar Ghat
Kelghar Ghat
Published on
Updated on
रघुनाथ पार्टे

केळघर : आंबेनळी घाटासारखीच वाईट अवस्था मेढा - महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटाची झाली आहे. घाटातील काळा कडा परिसर डेंजर झोन असून दुर्घटनेचा धोका आहे. या परिसरात संरक्षक कठडे नसल्यामुळे प्रवास जीवघेणा बनला आहे.

महाबळेश्वर - विटा या मार्गाचे काम गेली 3 -4 वर्षे सुरु आहे. केळघर घाटातही याच ठेकेदाराने काम केले आहे. काळा कडा ते खालचे माचुतर या टप्प्यात वन विभाग परवानगी देत नसल्याचे कारण पुढे करत रस्त्याचे रुंदीकरण, मोऱ्यांचे नुतनीकरण, साईड पट्टयांवर भराव, संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक याचे कामच झालेले नाही. याच परिसरात अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे.

महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना सातारवरून मेढामार्गे हा रस्ता सोयीचा वाटत असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे . परंतु नवख्या वाहन चालकांना काळा कडा टप्प्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पावसाळ्यात तर साईट पट्ट्यांवर भराव नसल्याने वाहन चालक डांबर सोडून खाली उतरत नसल्याने चालकांमध्ये वाद होतात. काही ठिकाणी दोन वाहनेही एकमेकांना ओलांडू शकत नसल्याने अपघात घडत आहेत. याठिकाणी ना मोऱ्यांचे रुंदीकरण, ना उंच संरक्षण कठडे, ना दिशादर्शक फलक अशी अवस्था आहे. त्यामुळे या 4 -5 कि .मी . रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी वाहन चालक, प्रवासी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news