

बामणोली :जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर कास पठार परिसरात पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी कर्ज काढून स्वतःच्या वडिलोपार्जित जागेत छोटे-मोठे हॉटेल व पर्यटनपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ४० मीटर अंतराच्या अटीमुळे व्यवसायांना परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्र संघटनेने केला आहे. या संदर्भात त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली.
शेतीला प्रतिकूल परिस्थिती, तसेच वन्यप्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे अनेकांची शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिकांनी पर्यटन व्यवसायाचा आधार घेतला आहे. एमसीआरडीसी कार्यालयाकडे आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, ४० मीटरच्या अटीमुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची ४० मीटरची अट रद्द करून ती ५ मीटर करण्यात यावी, अशी मागणी कास पठार स्थानिक भूमिपुत्र संघटनेने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ जाधव, उपाध्यक्ष यशवंत साळुंखे, सचिव लक्ष्मण गोगावले, सदस्य श्रीपती माने, शंकरराव जांभळे, संपत जाधव, ओंकार कदम, बाबुराव कार्वे, हृदयनाथ पार्टे, अमोल जाधव, अजित माने, विलास मोरे, गोविंद बादापुरे, संजय माने, संदीप अहिरे, अविनाश पवार, बबन पाटेकर, बाळकृष्ण फडतरे,माधव मोरे इत्यादी उपस्थित होते.