

सातारा : सातारा शहराला जीवनदायिनी ठरणारे कास धरण गुरुवारी रात्री अखेर ओव्हरफ्लो झाले. गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, 0.5 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सातारकरांना पाणीपुरवठ्याच्या द़ृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परिसरातील 15 गावांनाही पाणीटंचाईपासून मुक्तता मिळणार आहे.
कास धरणातून सातारा शहराच्या पश्चिम भागास नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ, चिमणपुरा पेठ, रामाचा गोट, व्यंकटपुरा पेठ, शुक्रवार पेठ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, प्रतापगंज पेठ, जंगीवाडा, सोमवार पेठ, बोगदा परिसर, चिपळूणकर बाग, माने कॉलनी, पॉवर हाऊस झोपडपट्टी, ढोणे कॉलनी, संत कबीर सोसायटी, पोळ वस्ती या भागास कास पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. तसेच कास पठार परिसरातील जवळपास 15 गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज याच धरणातून भागवली जाते.
सातार्याची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी विचारात घेता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुर्वीच्या तुलनेत या धरणात पाचपट पाणीसाठा केला जात आहे. दोन-तीन वर्षांपासून कास धरणात पूर्णक्षमतेने पाणीसाठा करणयत येत आहे. कास धरण गुरूवारी रात्री पूर्णक्षमतेने भरले. सध्या धरणात 60 फूट पाणीपातळी असून 0.5 टीएमसी इतका पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. या पाणीसाठ्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे. शहरातील नागरिकांच्या पाणीविषयक चिंतेला आता काही प्रमाणात विराम मिळाला आहे. पाण्याच्या सुरळीत व्यवस्थापासाठी सातारा नगरपालिकेने आधीच नियोजन केले असून दररोजचा पाणीपुरवठा वेळेवर आणि योग्य दाबात पोहोचण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
कास धरण क्षेत्रात अजूनही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कास धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे स्रोत वाहत असल्यामुळे धरणाची पाणीपातळी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. पाण्याची टंचाई ही सातार्यासह अनेक भागांतील सततची समस्या असताना यावर्षी सुरूवातीपासूनच झालेल्या समाधानकारक पावसामुळे कास धरण भरल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.