

पिंपोडे बुद्रुक : करंजखोप, ता. कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदाबाई गोविंदराव पवार माध्यमिक शाळेला पालकांनी बुधवारी सकाळी टाळे ठोकले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. शिक्षक वेळेवर शाळेत न येणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याच्या गोष्टींना कंटाळून पालकांनी आक्रमक भूमिका घेतली.
करंजखोप येथे शारदाबाई गोविंदराव पवार माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या सोळशी व नांदवळ या दोन भागशाळा आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक शाळेच्या कामकाजाच्या वेळेत उपस्थित राहत नाहीत. अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या शाळेत अनिवासी गुरुकुल प्रकल्प असल्याने शिक्षकांनी सकाळी 9 वाजता शाळेते येणे अपेक्षित आहे. मात्र, शिक्षक सोयीने शाळेत येत आहेत. याचबरोबर मुख्याध्यापक आनंद पवार हेच वेळेवर येत नसल्याने बाकी शिक्षक सुध्दा शाळेची वेळ पाळत नाहीत. याचा परिणाम म्हणून शाळेत येणारी मुले शालेय वेळेत इतर ठिकाणी फिरत असतात.
मुख्याध्यापक-शिक्षकांच्या या अनागोंदी कारभाराबाबत संस्थेच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने बुधवारी पालक संतप्त झाले. पालकांनी शाळेच्या गेटवर एकत्र येत उशिरा येणार्या शिक्षक व विद्यार्थ्यांना सुध्दा गेटच्या बाहेर थांबवून गेटला कुलूप लावले. संस्थेचे विभागीय अधिकारी दिनेश दाभाडे यानी शाळेला भेट दिली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.