Karad Crop Damage : कराड दक्षिणेतील पिके पाण्याअभावी करपली

शेतकरी हवालदिल ; कृषी विभागाकडून बांधावर जाऊन पिकांची पाहणी
Karad Crop Damage : कराड दक्षिणेतील पिके पाण्याअभावी करपली
Published on
Updated on

उंडाळे : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे उंडाळे परिसरातील खरीप पिके अक्षरशः पाण्याअभावी वाळत चालली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम साळुंखे यांनी कृषी विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र खरीपाची परिस्थिती चांगली असल्याचा दावा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केल्याने साळुंखे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली.

साळुंखे यांनी उंडाळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी वाळत आहेत, त्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी केली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, तसेच कृषी सहाय्यकांच्या पथकाला उंडाळे, टाळागाव, घोगाव, येळगाव परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले.या आदेशानंतर प्रशांत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाच्या पथकाने उंडाळे परिसरातील विविध शेतांवर जाऊन खरीप पिकांची पाहणी केली.

यावेळी उंडाळे परिसरातील कृषी सहाय्यक, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम साळुंखे, जयवंतराव देसाई, बाजीराव देसाई,सागर जाधव, सागर शेलार, निलेश पाटील, भाग्यश्री फरांदे, बाबा तोरणे, संतोष शिर्के, किरण कांबळे,संदेश कोंढावळे, अतुल रेड्डीज,रोहित शीगावकर, अश्विनी कुबडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बांधावर दिसली पिकांची दाहक स्थिती..

कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात पाहणी केली असता पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, पाण्याअभावी पिके वाळत चालल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी, मशागत, खते व औषधांवर खर्च केला; मात्र पावसाने साथ न दिल्याने संपूर्ण हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. खरीप हंगाम काही भागात पूर्ण शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव साळुंखे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news