

ढेबेवाडी : पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना वाढत असतानाच काळगाव, ता. पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगतची धोकादायक झाडे नागरिकांच्या जीवितासाठी धोक्याची ठरली आहेत. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणारे नागरिक याच झाडांच्या सावलीत थांबत असतात. मात्र, काही झाडे जीर्ण व धोकादायक झाली असून, त्यांच्या मोठमोठ्या फांद्या मुख्य रस्त्यावर पसरल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
काळगाव ते तळमावले मार्गालगत असलेल्या या झाडांना वीज व केबल तारांचा वेढा आहे. पावसाळ्यात झाडांची अवस्था अधिकच धोकादायक बनली असून, एखादे झाड किंवा मोठी फांदी अचानक कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्य केंद्र परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने हा धोका अधिक गंभीर आहे. रस्त्यावरील पूल व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र, वाढलेल्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यासह जीर्ण झाडे हटविण्याची आवश्यकता आहे. तसेच आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
‘जीवाला धोका, वाहतुकीलाही अडथळा’
काळगाव आरोग्य केंद्र परिसरातील धोकादायक झाडे तातडीने हटविण्याची गरज आहे. झाडांच्या फांद्या अपघाताला कारणीभूत ठरत असून, रस्त्यावरील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे पाटण तालुकाध्यक्ष गणेश यादव यांनी केली.