Kaas Plateau: कास पठारावर फुलला सातारी तुरा; दुर्मिळ फुलाच्या आगमनाने जैवविविधतेची चाहूल

पर्यटकांना पर्वणी
Kaas Plateau
Kaas Plateau: कास पठारावर फुलला सातारी तुरा; दुर्मिळ फुलाच्या आगमनाने जैवविविधतेची चाहूल Pudhari
Published on
Updated on

बामणोली : पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांची पावले आपोआपच जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठाराकडे वळू लागतात. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने या परिसरामध्ये संततधार सुरू केली असून अत्यंत दुर्मिळ व साताऱ्याचे नाव फुलांमधून जागतिक पटलावर कोरणारे सातारी तुरा म्हणजेच वायतुरा फुलाचे आगमन झाले आहे. त्यामुळे जैवविविधतेची चाहूल पठाराला लागली आहे.

अत्यंत दुर्मिळ प्रजाती म्हणून वायतुरा ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील पश्चिम घाटात, विशेषतः सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आढळणारी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ जलीय वनस्पती आहे. या वनस्पतीला सातारी तुरा, सातारेन्सिस किंवा वायतुरा असेही संबोधले जाते. या वनस्पतीला दोन ते तीन पानांच्या बेचक्यातून एक लांब दांडा वर येतो. या दांड्याच्या टोकावर इंग्रजी वाय अक्षरासारखा दोन भागांत विभागलेला फुलांचा तुरा येतो. या विशिष्ट रचनेमुळे प्रसिद्ध वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी याला 'वाय-तुरा' (वायतुरा) असे नाव दिले. स्थानिक भाषेत याला 'सातारी तुरा' किंवा 'साताऱ्याचा तुरा' असेही म्हणतात. संततधार पावसामुळे सध्या पठारावर ठिकठिकाणी हा सातारी तुरा दिसू लागला आहे. त्यामुळे पठार फुलांच्या हंगामासाठी सज्ज होवू लागल्याचे दिसत आहे.

साताऱ्यातील जागतिक वारसा स्थळ कास पठारावर आणि कास तलावाच्या परिसरात ही वनस्पती मुबलक प्रमाणात पाहायला मिळते. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून १००० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवरील खडकाळ सड्यांवर उगवते. पावसाळा सुरू झाल्यानंतर खडकांवर तयार होणाऱ्या तात्पुरत्या पाण्याच्या डबक्यांमध्ये या वनस्पतीची वाढ होते. जून ते ऑगस्ट या महिन्यांच्या दरम्यान ही वनस्पती पूर्णपणे बहरते आणि या काळात तिला फुले येतात.

भारताच्या उत्तर पश्चिम घाटात फुलतो वायतुरा

वायतुरा हा एक प्रकारचा लहान पाणवनस्पती कंद असून, याची उंची साधारणपणे १० ते २५ सें.मी. एवढी असते. मुळाशी छोटा कंद असणे हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या वनस्पतीला अत्यंत आकर्षक अशी जांभळट - गुलाबी किंवा गुलाबी-किरमिजी (Pink-Purple) रंगाची फुले येतात. फुलांचा देठ वर येऊन तो वाय आकारात दुभंगतो. ही वनस्पती केवळ भारताच्या उत्तर पश्चिम घाटात, प्रामुख्याने महाराष्ट्रातच आढळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news