

Kaas online ticket booking
सातारा : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठाराचा हंगाम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत दि. ४ सप्टेंबर पासून हंगाम सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी एकेरी वाहतुकीसह अन्य विषयांवर चर्चा झाली.
कास हंगाम आढावा बैठकीसाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी रेश्मा व्होटकरे, सहायक वनसंरक्षक एच. डी. जगताप, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपाळे, जावली वनक्षेत्रपाल एस. ए. पवार, पीएसआय संजय जाधव, उपकार्यकारी अभियंता आकाश पाटील, कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष वेंदे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी सातपुते यांनी तयारीच्या आढाव्याची माहिती दिली. यापूर्वी हंगाम दि. १ सप्टेंबरपासून सुरूवात करण्यात येणार होती. मात्र, पावसामुळे हंगाम पुढे ढकलण्यात आला. आता पाऊस थांबल्याने व पठारावर फुले उमलल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने ऑनलाईन बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. बैठकीमध्ये पार्किंग व्यवस्था तसेच पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यावर चर्चा झाली. तसेच रस्त्यांचा अंदाज घेऊन एकेरी वाहतूक सुरू करण्याचा विचार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. याबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी अंतिम चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.