

सातारा : पत्रकार पद्माकर सोळवंडे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर सातारा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना भेटून घटनेचा निषेध नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले.
बुधवारी दि. 25 जून रोजी दुपारी पत्रकार पद्माकर सोळवंडे यांना मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली. फोनवर हिंदी भाषेत बोलणार्या संशयिताने शिवीगाळ करत ‘तू गाळा सोडून दे, चाव्या दे, नाहीतर तुला जाळून टाकीन, मर्डर करीन,’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. ही बाब समोर आल्यानंतर एका पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर झालेला थेट हल्ला आहे, अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली.
पत्रकार संरक्षण कायद्याच्या चौकटीत हे प्रकरण येते आणि त्यामुळे याकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे करण्यात आली. या निवेदनानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी तत्काळ प्रतिसाद देत, शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, सातारा पत्रकार संघाचे विठ्ठल हेंद्रे, तुषार तपासे, संतोष शिंदे, ज्ञानेश्वर भोईटे, अमित वाघमारे, संदीप शिंदे, प्रतीक भद्रे, महेश चव्हाण, कैलास मायणे, वैभव बोडके व पत्रकार उपस्थित होते.