

सातारा : नोकरीच्या आमिषाने वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारीही यामध्ये सामील असल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांनी आरोग्य विभागात भरती करण्याच्या बहाण्याने एकूण नऊ जणांची फसवणूक केली आहे.
संतोष सदाशिव सुतार (रा. सणबूर, ता. पाटण) आणि महेश गंगाराम बंदरे (रा. नवी मुंबई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील महेश बंदरे हा मंत्रालयातील कक्ष अधिकारी आहे. याप्रकरणी वैजनाथ भालचंद्र आचपळ (वय 35, रा. कापडगाव, ता. फलटण) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फसवणुकीची ही घटना दि. 10 मार्च 2020 ते जुलै 2023 या दरम्यान घडली आहे. तक्रारदार वैजनाथ आचपळ व संतोष सुतार यांची 2018 मध्ये कराड येथे ओळख झाली. आचपळ यांच्या मुलाला नोकरीची गरज असल्याने संशयित सुतार याने त्याच्या ओळखीचे मंत्रालयात कक्ष अधिकारी असलेले महेश बंदरे हे पैसे घेऊन भरती करतात असे सांगितले. आरोग्य विभागात भरती निघाल्याचे सांगून एका मुलाला भरतीसाठी 3 लाख रुपये लागतील असे सुतार याने सांगितले. तक्रारदार यांनी दोन मुलांना नोकरी लावायचे आहे, असे सांगितल्यानंतर सुतार याने त्यासाठी 6 लाख रुपये मागून नोकरी 45 दिवसात लागेल, असे सांगितले.
तक्रारदार यांनी 6 लाख रुपये दिल्यानंतर संशयित सुतार व बंदरे या दोघांनाही तक्रारदार यांना व त्यांच्या मुलांना कागदपत्रे पाठवायला सांगितली. त्यानुसार कागदपत्रे पाठवण्यात आली. पैसे व कागदपत्रे दिल्यानंतर दोन महिने झाल्यानंतरही नोकरी लागली नाही. यामुळे तक्रारदार आचपळ यांनी पाठपुरावा केला असता मंत्रालयात अधिवेशन सुरु आहे. कामाला स्थगिती आली आहे. आणखी वेळ लागेल, अशी कारणे सांगून संशयित चालढकल करत होते. फसवणूक झाल्याचे आचपळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांच्या प्रमाणेच आणखी काही जणांची संशयितांनी फसवणूक केल्याचे समोर आले. यामध्ये मिलिंद वैजनाथ आचपळ, उमानंद वैजनाथ आचपळ, अजित किसन कचरे, राहुल बबन धायगुडे, सागर विठ्ठल पडळकर, साईराज शिवाजी वाघमोडे, सूर्यकांत निवृत्ती जाधव, शैलेश शिरीष क्षीरसागर, शुभम ज्ञानेश्वर कुंभार यांच्याकडून एकूण 20 लाख 25 हजार रुपये घेऊन नोकरी न लावता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. यामुळे तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दोघांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.