Satara water crisis: जिंती, अकाईचीवाडी पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

तलावातील पाण्याच्या मोठ्या प्रमाणात उपसामुळे तलाव पडले कोरडे
Satara water crisis: जिंती, अकाईचीवाडी पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर
Published on
Updated on
वैभव पाटील

उंडाळे : जिंती, अकाईचीवाडी व खोचरेवाडी परिसरातील तलावांमधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने तिन्ही तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला असून परिसरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

विभागात तीनही तलावातील पाणी पूर्णतः गाळावर आले असून मृत साठ्यापैकी अवघे 40 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या तलावातील पाणी विहिरींमध्ये सोडण्यात येत असले तरी ते पूर्णतः गाळमिश्रित असल्याने ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जनावरांच्या पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली असून तलावातील गाळात जनावरे रुतण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने टंचाई निवारणासाठी नियोजन करण्याबाबत ठराव करून जलसंधारण विभागाकडे सादर केला आहे. जलसंधारण विभागानेही परिस्थितीची दखल घेत तलावातील पाणी उपसा बंदीबाबत योग्य निर्णय घेण्यासंदर्भात अहवाल महसूल विभागाकडे पाठविला आहे. मात्र, उपसा बंदीबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याच्या कारणात उपसा बंदी लटकली आहे. अद्यापही तलावातून पाण्याचा उपसा सुरूच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत तलावातील उर्वरित पाणीसाठा संपुष्टात येण्याची शक्यता असून मे अखेर व जून महिन्यात जिंती परिसराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन प्रभावी टंचाई नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. दरम्यान, यंदा वळीवाचा पाऊसही पडला नाही. त्यामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. वेळेवर मान्सूनही आला नाही तर या परिसराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news